नायलॉन मांजा विरोधात पोलिसांची यशस्वी कारवाई: दोन आरोपी अटकेत, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंचवटीत दोन ठिकाणी पोलिसांचा सापळा, नायलॉन मांजा विक्री रोखण्यात यश

लाल दिवा-नाशिक, ४ डिसेंबर २०२४ (प्रतिनिधी) – येत्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस दलाने नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. पंचवटी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ६५,८०० रुपये किमतीचा ९९ नग नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पंचवटीतील कुमावत नगर पाटाजवळील शिव मंदिराजवळ आणि गुरूदत्त कलेक्शनजवळ, वखारी समोर, मखमलाबाद नाका येथे पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत इम्रान महमूदसन शहा (१९) आणि शुभम भाऊसाहेब आहिरे (२९) यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले की, नायलॉन मांजा पक्षी, प्राणी आणि मानवांसाठी अत्यंत धोकादायक आहे. या मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि त्यांना हद्दपारही केले जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती असल्यास ती पोलिसांना कळवावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. पारंपारिक मांजा वापरून सुरक्षित आणि आनंददायी मकर संक्रांत साजरी करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!