पोलिसांनो….. खबरदार …..जर सराफ व्यवसायिकांना हकनाक त्रास द्याल तर…. पोलीस महासंचालकांचे पोलीस आयुक्त व अधीक्षकांना अधिसूचना जारी…… सराफ व्यवसायिकांनी मानले आभार…… पोलिसांच्या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये दोन सराफ व्यावसायिकांनी केली होती आत्महत्या…….!
लाल दिवा -नाशिक,ता.१५ :- राज्यातील सराफ व्यावसायिकांकडून चोरीची/संशयित मालमत्ता जप्त करताना तपासी अधिका-यांनी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे तसेच, सराफांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य स्तरावर “राज्य स्तरीय दक्षता समिती” स्थापन करण्याबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून उपरोक्त संदर्भाधीन परिपत्रकान्वये राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
निर्दोष सराफ व्यापाऱ्यांना नाहक त्रास होऊ नये तसेच आरोपीलाच शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून सदर मार्गदर्शक तत्वांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपरोक्त परिपत्रकांच्या धर्तीवर शासन स्तरावरून राज्यातील सर्व पोलीस घटकांना सर्वसमावेशक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
उपरोक्त पार्श्वभूमीवर या संदर्भात सर्वसमावेशक पुनःश्च मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत :-
- अ) तपास अधिकाऱ्यांसाठी सूचना –
१. सराफा व्यावसायिकांच्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाच्या स्तरावर ‘राज्यस्तरीय दक्षता समिती तसेच, प्रत्येक पोलीस आयुक्तालय व जिल्हास्तरावर ‘दक्षता समिती स्थापना करण्यात यावी. राज्यस्तरावरील समितीची वर्षातून
एकदा आणि पोलीस आयुक्तालय व जिल्हास्तरावरील समित्यांची दर तीन महिन्यांनी एकदा याप्रमाणे बैठका आयोजित कराव्यात.
- २. तपास अधिकाऱ्यांनी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक केल्यानंतर पंचांसमक्ष चोरीच्या मुद्देमालाबद्दल सविस्तर चौकशी करावी.
३. प्रथम खबर अहवालामध्ये चोरी गेलेल्या दागिन्यांचे वर्णन आणि वजन याची सविस्तर नोंद करण्यात यावी.
- ४. सर्व सराफ व्यावसायिकांकडे ठेवण्यात आलेल्या नोंदवहीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांने त्या दुकानात येण्याचे प्रयोजन तसेच संबंधीत तपासाधीन गुन्ह्याबाबतची माहिती नोंदवून स्वाक्षरी करावी.
५. कायदेशीर कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराखेरीज इतर व्यक्ती अशा कार्यवाहीमध्ये सहभागी असू नयेत.
- ६. कार्यक्षेत्राबाहेरील ठिकाणी तपास करावयाचा असल्यास संबंधित दुकानामध्ये थेट न जाता सर्वप्रथम जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नेमलेल्या संबंधित दक्षता समितीच्या निदर्शनास आणून पुढील कारवाई करावी. तसेच तपासाची गोपनीयता पाळून संबंधीत तपासी अधिका-यास आवश्यकतेनुसार दक्षता समितीने मदत करावी.
७. तपासी अधिकारी हे चोरीचा माल हस्तगत करण्यास जाण्यापुर्वी संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आयुक्तालय क्षेत्रात संबंधित पोलीस आयुक्त यांना तसेच, जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात संबंधीत जिल्हा पोलीस अधिक्षक अथवा पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना प्रथम अवगत करावे.
- ८. सराफ व्यावसायिकांच्या दुकानात प्रवेश केल्यानंतर तपासी अधिकाऱ्याने व्यावसायिकास गुन्ह्याचा ‘प्रथम खबर अहवाल /गुन्ह्याशी संबंधीत माहिती तसेच, आरोपीकडून हस्तगत केलेल्या मालमत्ता यासंबंधीची छायांकीत प्रत/माहिती द्यावी. जेणेकरुन सराफ व्यावसायिकांना त्यांचेकडील अभिलेख पडताळून त्यासंदर्भात सविस्तर माहिती/खुलासा पोलीस अधिकाऱ्यास सादर करणे शक्य होईल.
९. पोलीस अधिका-याने सराफ व्यावसायिकाचा जबाब शक्यतो त्याच्या दुकानात नोंदवावा तसेच, त्यांना पोलीस पथकासमवेत येण्याची जबरदस्ती करू नये.
- १०. गुन्ह्यामध्ये सराफ व्यावसायिकाचा सहभाग असल्याची खात्री करण्यासाठी परिपूर्ण प्राथमिक चौकशी करण्यात यावी. पुरेसा पुरावा उपलब्ध झाल्यानंतर व तपास कामात अटक करणे आवश्यक असेल तरच अटकेची कारवाई करावी. अटकेची अचूक तारीख आणि वेळ अटक करताना अभिलेखात नमूद करावी.
११. पोलीस अधिकाऱ्याने जागीच पंचनामा करुन सनदशीर मार्गाने जागेची झडती घ्यावी. शक्यतो मुद्देमालासंबंधीची कागदपत्रे जागेवर पडताळून, फक्त संबंधीत मूळ कागदपत्रे पुरावा म्हणून जप्त करावीत.
- १२. सराफ व्यावसायिकांच्या संघटनेने प्राधिकृत केलेल्या व्यक्तींना किंवा दोन स्थानिक साक्षीदारांना झडतीच्या वेळेस हजर ठेवण्याची मुभा द्यावी.
१३. व्यावसायिकांकडे चोरीचा मुद्देमाल आढळून आल्यास पोलीसांनी पंचांसमक्ष तो मुद्देमाल रीतसर जप्त करावा. तसेच, पंचनामा/जप्ती पंचनाम्याची प्रत सराफ व्यावसायिकास त्याच्या दुकानातच तात्काळ उपलब्ध करुन देऊन त्याची स्वाक्षरी घ्यावी.
- १४. सराफ व्यावसायिकाशी संबंधीत कामगार व अन्य व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी सादर केलेल्या मुलभूत माहितीबाबतच्या कागदपत्रांची स्वतंत्र नोंदवहीमध्ये नोंद घ्यावी.
१५. सराफ व्यावसायिकांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम ४११ नुसार कार्यवाही करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. एखाद्या सराफ व्यावसायिकाने चोरीची मालमत्ता कोणत्याही गैरहेतूने घेतली नसल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचा आरोपी विरुध्द साक्षीदार म्हणून उपयोग करावा.
- १६. तपासात सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्याने गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नये. अशा प्रसंगामध्ये पोलीस अधिकाऱ्याने उच्च प्रतीचा व्यावसायिकपणा दाखविणे अपेक्षित आहे.
ब) सराफ व्यावसायिकांसाठी सूचना –
पोलीस तपासात पारदर्शकता राहावी तसेच व्यावसायिकांना नाहक / विनाकारण त्रास होऊ नये यासाठी सराफ व्यावसायिकांनी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे :-
- १. संपूर्ण सराफा बाजारात व इतर ठिकाणी सोन्या-चांदीचे व्यापार करणारे, गहाण ठेवणारे, सुवर्णकार व त्यासंबंधाने काम करणाऱ्या सर्व व्यक्ती यांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेली मुलभूत माहिती (नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इ.) संबंधीत पोलीस ठाणे येथे अद्ययावत करावी.
२. सराफ व्यापारी यांचेकडे सोन्या-चांदीचे दागिने अथवा वस्तू विकण्याकरीता अथवा गहाण ठेवण्याकरीता ग्राहक आल्यास, त्याची ओळख पटवून घेण्यासाठी अधिकृत ओळखपत्राची छायांकीत प्रत घेण्यात यावी तसेच स्वतंत्र नोंदवहीमध्ये संबंधीतांची नोंद घ्यावी.
- ३. संशयित गुन्हेगार सोन्या-चांदीचे दागिने अथवा वस्तु विक्री करीता घेऊन आल्यास त्याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाणे/गुन्हे शाखा अथवा स्थानिक गुन्हे शाखा यांना त्वरीत देण्यात यावी.
४. सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्यतो दुकान परिसरात सराफ व्यावसायिकांनी अद्ययावत CCTV यंत्रणा स्थापित करावी.
- ५. उपरोक्त मुद्दा क्र. (अ) ८ मध्ये नमूद बाबीच्या अनुषंगाने, तपासी अधिका-याने विचारणा केल्यास त्या दिनांकापासून पुढील पाच दिवसात सराफ व्यावसायिकांनी त्याबाबत खुलासा सादर करावा.
६. गुन्हेगाराने चोरी केलेला माल ज्या सराफ व्यापाऱ्याकडे विकला आहे त्याचे नाव जबाबात नोंदविल्यास माल हस्तगत करतेवेळी संबंधित सराफा व्यापारी/कर्मचारी, संबंधित सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी/सदस्यांनी पोलीसांना सहकार्य करावे.
7. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक २०२४०३१४१६३११०८४२९ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.