नाशिकरोडमध्ये सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ‘शांतता रूट मार्च’: नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण
- कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिकरोड पोलिसांचा ‘शांतता रूट मार्च’ प्रभावी ठरणार
लाल दिवा-नाशिक,दि.१२ :- श्री गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड विभागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी संवेदनशील भागात ‘शांतता रूट मार्च’ काढला.
पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या रूट मार्चचे नेतृत्व पोलीस उपायुक्त परिमंडळ २ श्रीमती मोनिका राऊत यांनी केले. सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी हे देखील यावेळी उपस्थित होते.
नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको चौक, महात्मा गांधी पुतळा देवळाली गाव ते छत्रपती मैदान, देवळाली गाव पर्यंत हा रूट मार्च संध्याकाळी ५.२० ते ६.०५ वाजेदरम्यान पार पडला.
यावेळी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक गिरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्रीमती तृप्ती सोनवणे आणि उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्यासोबत १० सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, दंगा नियंत्रण पथकातील २० पोलीस अमलदार, राज्य राखीव पोलीस दलातील एक अधिकारी आणि २० पोलीस अमलदारांसह एकूण ४५ पोलीस अमलदार आणि ५० होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता.
रूट मार्च शांततेत पार पडला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला असून नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.