पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमांची सांगता चित्रकला स्पर्धेने
पोलीस-विद्यार्थी मैत्रीचा रंग! चित्रकलेतून उमलला आदरभाव
लाल दिवा-नाशिक,३०:-(प्रतिनिधी, नाशिक) दि. ३० नोव्हेंबर २०२४ – देशसेवेसाठी प्राणार्पण केलेल्या पोलीस शहीदांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी पोलीस स्मृतिदिन साजरा केला जातो. नाशिक शहर पोलिसांनी यावर्षीही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पोलीस स्मृतिदिनाचे औचित्य साधले. या कार्यक्रमांची सांगता एका अनोख्या चित्रकला स्पर्धेने झाली. पोलीस आणि विद्यार्थी यांच्यातील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी, तसेच पोलिसांच्या कार्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
२१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित पोलीस स्मृतिदिन सप्ताहाचा हा एक भाग होता. या स्पर्धेत “पोलीस आमचा मित्र,” “पोलिसांची राष्ट्र उभारणीतील भूमिका” आणि “जागृत विद्यार्थी म्हणून आमची भूमिका” या आशयावर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांचे चित्रांमधून सादरीकरण केले. शहरातील ३७ शाळांमधून १५० हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांच्या चित्रांमधून पोलिसांबद्दलचा आदर, त्यांच्या कामाची जाणीव आणि पोलीस दलाविषयीचे कुतूहल स्पष्टपणे दिसून येत होते.
२९ नोव्हेंबर रोजी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सिंधू सागर अकॅडमी, होरायझन अकॅडमी, माधवराव लेले विद्यालय, एस. जी. पब्लिक स्कूल, सिन्नर या शाळांतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले.
श्री. किरण कुमार चव्हाण, श्री. प्रशांत बच्छाव, श्रीमती मोनिका राऊत, श्री. चंद्रकांत खांडवी आदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. श्री. सुधाकर सुरडकर, श्री. दिवाणसिंग वसावे आणि पो. ह. सचिन जाधव यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते.
पोलीस आणि विद्यार्थी यांच्यातील मैत्रीचे बंध अधिक घट्ट करण्यासाठी असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.