नाशिकमध्ये पोक्सो कायद्याचा बडगा, तरुणीशी छेडछाडी करणाऱ्या तरुणावर गुन्हा !
नाशिकमध्ये प्रेमाच्या मागे लागलेल्या ‘मैत्री’च्या सावलीत तरुणी भयभीत
लाल दिवा-नाशिकरोड,दि.१४ : शहरातील नाशिकरोड परिसरात ‘मैत्री’चा नरकासुर एका तरुणीला घेरुन असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत पाठलाग करत, गोड शब्दांचा गळाभरवून ‘प्रेमजालात’ अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ‘मित्रा’च्या छायेतून बाहेर पडण्यासाठी तरुणीने अखेर पोलिसांची मदत घेतली आहे.
राहुल केदार असे या तथाकथित ‘मित्राचे’ नाव असून वयाच्या पंचविशीत असलेला हा तरुण, पीडित तरुणीच्या मागे सावलीसारखा वावरत असल्याचे समोर आले आहे. तरुणी राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये असो वा लिफ्टमध्ये, तो तिच्यासमोर अचानक प्रकट होऊन गोड बोलण्याचा प्रपंच रचत असे. “राहुलाला ओळखतेस का?”, “सौरभ ओळखतोस का?”, “तू मला खूप आवडतेस”, “माझ्यासोबत मैत्री कर” असे गोड शब्दांनी तो तरुणीला भुरळ घालण्याचा प्रयत्न करीत असे.
पण या ‘गोड’ शब्दांमागे लपलेली भितीदायक नियत ओळखून तरुणीने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. पण ‘नाकार’ हा शब्द त्याच्या शब्दकोशातच नसल्यामुळे तो तिचा सतत पाठलाग करू लागला. अखेर या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीने हिंमत करत नाशिकरोड पोलीस स्टेशन गाठत राहुलविरोधात तक्रार दाखल केली आहे. .
पोलिसांनी भादंवि कलम ७८, ७९ आणि पोक्सो कायदा कलम १२ अंतर्गत राहुलविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सपोनि कोरडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु आहे. मात्र, अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
दरम्यान, ‘प्रेम’ आणि ‘मैत्री’च्या आडून होणारी छेडछाड ही गंभीर बाब असून त्याविरुद्ध आवाज उठविण्याचे धाडस दाखवणाऱ्या या तरुणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.