अहो एकल का !…..हिरेंच्या अपूर्वाई साठी सुधाभाऊ “बंड” करत गरजले…..चर्चेला उधाण !
भगवान थोरात
लाल दिवा-नाशिक, ता. ५ : मागील गेल्या दोन दशकापासून शिवसेनेचे सुधाकर बडगुजर व राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे यांच्यामध्ये नेहमीच कमालीचे वाक-युद्ध होतानाचे चित्र समस्त सिडको व नाशिककर यांना बघायला मिळाले. दोघेही एकमेकांच्या विरोधात नेहमीच छुप्या पद्धतीने दंड थोपटताना दिसून आले. बहुतांश वेळा बडगुजर यांनी अपूर्व यांच्या कामाची चांगलीच पोलखोल केली. एवढेच नव्हे तर मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अपूर्व हिरे यांना वाढदिवसाच्या नक्कीच झाला असता अशी देखील कुजबुज नंतर ऐकायला मिळाली. तर विद्यमान आमदार यांच्या बाबतीत त्यांचा ही विरोधातील भूमिका पथ्यावरच पडली. अशी देखील चर्चा रंगल्याचे त्यावेळी दिसून आले. तब्बल दोन दशकांनंतर हिरे कुटुंबीयांबद्दल बडगुजर यांना फुटलेली प्रेमाची उकळी तेव्हाच आली असती तर कदाचित आज चित्र वेगळे असते. तसे बघितले तर आजही नाशिक पश्चिमच्या राजकारणामध्ये सुधाकर बडगुजर हे काहीं ठिकाणी “वजीर” म्हणून भुमिका बजावत असल्याचे दिसून येते. लोकसभा असो, विधानसभा असो वा स्थानिक स्वराज्य संस्थेची मनपा निवडणूक असो. नेहमीच बडगुजर यांचा वरचष्मा असल्याचे बघायला मिळाले. श्री. बडगुजर यांनी आपल्या प्रभागांमध्ये केलेले विकास कामे हे डोळ्यात भरण्यासारखे आहे. त्यामुळे आजही त्यांना विकास पुरुष, एक कणखर, मातब्बर व मुरब्बी राजकीय नेता म्हणून बघितले जाते. नक्कीच एखाद्याच्या विजय व पराभवामागे त्यांचा हात असतो. असेही सहज गप्पा मारताना बहुतांश राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व जनता बोलताना दिसून येते. श्री. बडगुजर यांनी अवघ्या काही कालावधीमध्ये राजकारणात आपला दबदबा निर्माण केला असून त्यांच्या शिवाय काहींचे पान देखील हालत नाही. असे देखील बोलले जाते. त्यातच भरीस भर म्हणजे नुकतेच हिरे कुटुंबिया मागे लागलेले शुक्ल काष्ट व त्यांच्यावर दाखल होत असलेले गुन्हे. याबाबत सर्वचजण केवळ बघायची भूमिका घेत असताना. अचानक भयानक दस्तर खुद्द एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले श्री. बडगुजर यांनीच या प्रकरणांमध्ये पुढाकार घेत हिरे कुटुंबीयांची पाठराखण केल्याचे दिसून येत आहे. हिरे कुटुंबीयांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये केवळ हिरे कुटुंबियांचा दोष नसून त्यात प्रशासकीय अधिकारी दोशी आहेत. हिरे कुटुंबीय निर्दोष असल्याचे सांगून त्यांनी ते एकप्रकारे निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिल्याची भावना व्यक्त करत प्रकरणाला सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. यामुळे राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामागे नेमके राजकारण आहे तरी काय ? हे आगामी काळातच दिसून येईल. असे असताना त्यांनी हिरे ची केलेली पाठराखण सध्या तरी आगामी राजकारणाची दिशा बदलाची नांदी ठरू शकते. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
- ♦चौकट
- बडगुजर यांच्या विधानाने बदलू
- शकते आगामी काळचे राजकारण
नाशिक पश्चिम मतदारसंघात मागील दोन विधान सभा पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा पक्षाचा बोल बाला असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे तिकीट सोडले तर अपूर्व हिरे यांनी केवळ आपल्या एकट्याच्या बलबुत्त्यावर विधानसभा निवडणूक लढवली. तेंव्हा जर हिरेना यदाकदाचित श्री. बडगुजर यांच्यासारख्या व्यक्तीची साथ मिळाली असती तर आजचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते. असे बोलले जात होते. परंतु प्रथमच त्यांनी हिरे कुटुंबीयांची केलेली पाठराखण हा सध्या चर्चेचा विषय ठरत असून आगामी काळात हिरे व बडगुजर एकत्र आल्यास सिडकोचे राज करणात नक्कीच वेगळे चित्र बघायला मिळेल. असाही अर्थ या निमित्ताने काही राजकीय विश्लेषक काढताना दिसत आहे. परंतु या जर-तर च्या राजकरणात आगामी काळात कोण कोणाच्या बरोबर असणार आणि कोण कोणासाठी फायद्याचे व तोट्याचे ठरणार हे आता काळच ठरवणार. एवढे मात्र नक्की !
- प्रतिक्रीया
हिरे कुटुंबावरती बोगस शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करून भ्रष्टाचार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले गेले परंतु कुठली भरती शासनाच्या मंजुरी शिवाय होत नाही या शिक्षकांचे अनेक वर्षापासून शासनाच्या मंजुरीने पगार कित्येक वर्षापासून घेत आलेले आहे जर बेकायदेशीर शिक्षक भरती झाली असेल तर शासनाने त्यांचे पगार बिल पास कशी केली हा माझ्या मनामधला प्रश्न आहे परंतु हिरे कुटुंबीयांना जाणून बुजून फसवण्याचा प्रयत्न एकतर्फी दिसत आहे जर ह्या भरती प्रकरणास शासनाने मंजुरी दिली असेल शिक्षण अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असेल तर भरती बेकायदेशीर कशी जर भरती बेकायदेशीर असेल त्यास शासन सुद्धा व शासनातील अधिकारी सुद्धा त्यास जबाबदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाली पाहिजे फक्त हिरे कुटुंब जबाबदार धरून चालणार नाही
- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना, नाशिक