श्राद्धात आघारी देताना आगीचा भडका, वृद्धाचा होरपळून मृत्यू
नाशिकमध्ये दुर्दैवी घटना, ज्वलनशील पदार्थामुळे घडली दुर्घटना
लाल दिवा-नाशिक,दि.३०:-सिडको नाशिक: पितृपक्षातील श्राद्धादरम्यान घराघरात श्रद्धेचा ओघ असेलला असतानाच नाशिक येथील गुलमोहर कॉलनीमध्ये एका धक्कादायक घटनेने हादरवून टाकले आहे. रविवारी सकाळी आघारी देताना आगीचा भडका उडाल्याने ६७ वर्षीय वृद्धाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. दिनकर मार्तंड काळे असे मृतांचे नाव असून ते गणेश एट्रीया अपार्टमेंट, कामवाडे सिडको येथे राहत होते.
घटना अशी की, रविवारी सकाळी १२ वाजेच्या सुमारास काळे हे त्यांच्या निवासस्थानी इतरांना श्राद्धात आघारी देत होते. आघारीसाठी तयार करण्यात आलेल्या चुलीत लाकूड आणि तूप टाकून ते पेटवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आग नीट पेटत नसल्याने त्यांनी काही ज्वलनशील पदार्थ त्यात टाकला. त्यामुळे पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि काळे यांच्या अंगावर पसरली.
आगीत काळे हे गंभीररित्या भाजले गेले. त्यांच्या तोंडाला, छातीला आणि मानेला आगीची सर्वाधिक लागण झाली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनी आणि इतर नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.
- आघारी देताना काळजी घ्या!
ही घटना सर्वांसाठी एक धक्कादायक आहे. पितृपक्षात श्राद्ध करताना आणि आघारी देताना सर्वांनी काळजी घ्यावी, ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.