नाशिक ग्रामीण पोलीसांचे अवैध व्यवसाय विरोधी अभियान ७६४ ठिकाणी छापे, चार कोटी चोवीस लक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त….!
लाल दिवा-नाशिक,दि.१ : ग्रामीण पोलीसांनी जिल्ह्यातील गुटखा व्यवसायास पायबंद घालण्यासाठी यापूर्वी तीन अभियान राबविली होती. दिनांक ६/१०/२०२३ पासून जिल्ह्यातील गुटखा व्यवसाय नेस्तनाबूत करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी गुटखा विरोधी अभियान ४ सुरू केले होते.
दिनांक ६/१०/२०२३ ते दिनांक ३१/१०/२०२३ या तीन आठवड्यात नाशिक ग्रामीण पोलीसांनी गुटखा विरोधी १०७ कारवाया करून ११० आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३२८ खाली अटक केली आहे. सदर कारवायात एकूण १ कोटी ७६ लक्ष ४२ हजार ६८३ रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.
गुटखा व्यवसायाबरोबरच जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद व्हावेत या दृष्टीकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी याच कालावधीत वेगवेगळया सदराखाली एकूण ७६४ ठिकाणी छापे मारून सर्वच प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाई केली आहे. यात गुटखा कारवाईच्या १०७ केसेससह मुंबई दारूबंदी कायद्याखाली ५०५, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली १०१, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाखाली ३८, जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली १०, अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली ३ कारवायांचा समावेश असून, यात एकूण ९७८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण ४ कोटी २४ लक्ष रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
- जिल्हयातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलीसांपर्यंत पोहोचावी, या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी खबर ही हेल्पलाईन सुरू केली असून, नागरिकांनी
- ६२६२ २५ ६३६३ या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या परिसरात चालणा-या अवैध व्यवसायांची
- माहिती नाशिक ग्रामीण पोलीसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.