नाशिक ग्रामीण एल सी. बी. चे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांची दमदार एन्ट्री……घोटी येथील खून प्रकरणी मयताची पत्नी आणि २ युवकांवर खुनाचा गुन्हा दाखल….!
लाल दिवा-नाशिक,ता.२६ :- : घोटी बुद्रुक येथील रुपेश संतु साबळे ४२ वर्षे रा. श्रीरामवाडी घोटी यांना जीवे ठार मारून त्याची ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप केला म्हणून घोटी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली होती. घोटी बुद्रुक गाव शिवारातील रेल्वे लाईनच्या बाजुला विकास भाऊराव जाधव यांच्या पडीत शेतात रुपेश संतु साबळे ४२ वर्षे याच्या चेहऱ्यावर दगडाने मारुन त्यास जिवे ठार मारले म्हणून पोलीस नाईक गणेश एस. देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घोटी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी माधव सुरेश कडू वय २५ वर्षे, रा. शनि मंदिराजवळ घोटी, गोरख रामदास कडु, वय ३० वर्षे, रा. अवचितवाडी, मयताची पत्नी सविता रुपेश साबळे, वय ३२ वर्षे, रा. श्रीरामवाडी घोटी बुद्रुक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोघे संशयित युवक अटक करण्यात आले आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजय कोटे यांनी आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणला. घोटी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.