नाशिक रोड व पश्चिम विभागात अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई, आठवड्यात चार ठिकाणी कारवाई, अतिक्रमण विरोधात एक महिन्याची विशेष संयुक्त मोहिम – उपायुक्त करूणा डहाळे ..!
लाल दिवा -नाशिक,ता.१३: मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करूणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमण विरोधात धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. नाशिक रोडसह शहराच्या मध्यवर्ती भागात आठवडाभरात चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. 5 मे रोजी शालिमार येथील 24 अनधिकृत दुकानांवर मोठी कारवाई केल्यानंतर पुढील सात दिवसात अमृतधाम, रविवार कारंजा परीसरात अनधिकृत टपरीधारकांवर आणि व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. आज दि. 12 मे रोजी नाशिक रोड येथे शिवाजी चौक, बिटको पॉईंट, वॉस्को चौक ते गायकवाड मळ्यापर्यंत रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. 5 टेबल, 15 कॅरेट, सहा स्टॅण्ड बोर्ड, पाच वजनाचे काटे, चार छत्र्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच पश्चिम विभागातील दहीपूल, सीबीएस, शालीमार परीसरात कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान 15 लोखंडी, लाकडी स्टॅण्ड, 18 प्लॅस्टिकचे पुतळे, कपड्यांचे 17 नग जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य अतिक्रमण विभागाच्या आडगाव येथील गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले.
मा. आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करूणा डहाळे यांनी सहा विभागीय अधिका-यांची बैठक घेऊन मोहीम प्रभावीपणे राबविण्याची सूचना केली आहे. सुमारे एक महिनाभर व्यापक स्वरुपात विशेष संयुक्त मोहिम सुरु रहाणार आहे. स्वत:हून अनधिकृत बांधकामे, पत्र्याचे शेड, टप-या अशा प्रकारचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे. अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल आणि कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसुल करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती करुणा डहाळे यांनी दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त मदन हरीशचंद्र, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर, पंचवटीचे नरेंद्र शिंदे, पूर्व विभागाचे राजाराम जाधव, नवीन नाशिक व सातपूर विभागाचे डॉ. मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सहाही विभागातील अतिक्रमण पथक आणि वाहनांचा सहभाग आहे.
*सात दिवसातील विशेष मोहिम*
5 मे – शालीमारला 24 अनधिकृत पत्र्यांची दुकाने हटविली
10 मे – हिरावाडी लिंकरोड येथे एक अनधिकृत बांधकाम शेड जमिनदोस्त
अमृतधाम येथील नऊ आणि आडगांव पोलीस स्टेशन जवळील दोन अशा एकूण 11 टप-या जप्त, निलगिरी बाग येथे रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई
11 मे – मेनरोड, आर. के. धुमाळ पॉईट, एमजी रोड, सीबीएस येथे कारवाई, 251 नग कपडे, 40 कॅरेट, 27 प्रवासी बॅगा, 10 प्लॅस्टिक डबे, 1 चार चाकी गाडी जप्त
12 मे – नाशिक रोड आणि पश्चिम विभागात रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई