खंडणीसाठी वृद्ध ठेकेदाराचे अपहरण, नंतर निर्घृण खून! नाशिक पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तीन जणांना बेड्या
नाशिक पोलिसांच्या शौर्यामुळे खूनी जाळ्यात
लाल दिवा-पुणे,डोणजे/नाशिक – माणुसकीला काळिमा फासणारी, हृदयाला हादरवून सोडणारी एक क्रूर घटना डोणजे परिसरात घडली. शासकीय ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०), जे आपल्या रोजच्या दिनक्रमात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले, ते पुन्हा कधीच घरी परतले नाहीत. काळाच्या पडद्याआड झाकलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. अपहरण, खंडणी आणि शेवटी निर्घृण खून! पैशाच्या मोहाने माणसाच्या मनातील क्रूरतेला उधाण आले होते. पण न्यायाच्या देवतेला जागे करण्यासाठी पोलीसही होते, चोख कामगिरी करणारे, अविरत कर्तव्याला वाहिलेले नाशिक पोलीस!
पोळेकर यांची मुलगी सोनाली यांनी हवेली पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता व्यक्तीची नोंद केली तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की, यामागे एक भयंकर कट रचला गेला आहे. तपासाची चक्रे फिरू लागली आणि समोर आले सत्य अंगावर काटा आणणारे होते. पोळेकर यांनी पायगुडे वाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या शासकीय कामाचा ठेका घेतला होता. याच कामात अडथळा आणण्यासाठी, योगेश उर्फ बाबू किसन भामे नावाच्या सराईत गुंडाने पोळेकर यांच्याकडे जॅग्वार कार म्हणून खंडणी मागितली होती. ही मागणी पूर्ण न झाल्यास, पोळेकर आणि त्यांचा मुलगा प्रशांत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास सुरू केला. धाग्यांचा शोध घेत, गुंता सोडवत, पोलिसांनी पांढऱ्या स्विफ्ट कारचा माग काढला. ही कार योगेश भामे वापरत होता. याच कारमध्ये भामे, त्याचा भाऊ रोहित आणि इतर दोन साथीदार शुभम सोनवणे आणि मिलिंद थोरात यांनी पोळेकर यांचे अपहरण केले. आरोपी रेल्वेने उत्तर भारताकडे पळून गेले होते. पण नाशिक पोलिसांनी हार मानली नाही. पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधला. पोलीस आयुक्त कर्णिक यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांना आदेशित केले त्यांनी आपल्या पथकास पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण,भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, भगवान जाधव आणि रविंद्र दिघे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि जबलपूर पोलिसांच्या मदतीने सोनवणे आणि थोरात यांना गजाआड करण्यात आले. त्यांनी पोळेकर यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली. रोहित भामेलाही पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
...या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, हवेली पोलीस, नाशिक शहर गुन्हे शाखा, आरपीएफ नाशिक रोड आणि जीआरपी जबलपूर यांचा समावेश होता. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार आणि पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण ,भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, भगवान जाधव आणि रविंद्र दिघे यांच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि चपळाईमुळे हे प्रकरण लवकर उघडकीस आणण्यास मदत झाली आहे. योगेश भामेच्या अटकेनंतर या घटनेचे पूर्ण सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे योगेश भामे अद्याप फरार आहे, पण पोलिसांचा शोध सुरू आहे. लवकरच तोही न्यायाच्या कठड्यात उभा राहील आणि न्याय मिळेल याची खात्री आहे. नाशिक पोलिसांनी या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, ते नेहमीच न्यायाच्या बाजूने, सत्याच्या बाजूने उभे असतात. ही कामगिरी त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण पोलीस दलासाठी भूषणावह आहे.