नाशिक पोलिसांचे लाचखोरीविरुद्ध कडक पाऊल, पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
भ्रष्टाचाराविरुद्धची ‘ऑपरेशन क्लिनअप’: नाशिक पोलिसांची जोरदार एंट्री!
लाल दिवा-नाशिक,दि.१९: नाशिक शहरात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कडक पावले उचलली आहेत. पोलीस पडताळणी किंवा इतर कोणत्याही सेवेसाठी पैसे मागणाऱ्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
पोलीस पडताळणीसाठी (पासपोर्टसाठी ३० दिवसांसारखे) निश्चित केलेल्या वेळेपेक्षा जास्त विलंब झाल्यास, नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सअॅप क्रमांक ९९ २३३ २३३ ११ वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल. तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले आहे.
या उपक्रमाचे कौतुक करत, ‘मी नाशिक्कर’ या ट्विटर हँडलने पोलीस पडताळणीबाबत नाशिक पोलिसांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
नाशिक पोलिसांचा ‘शासक नाही सेवक’ हा मंत्र देत ‘सुरक्षित नाशिक’ आणि ‘भ्रष्टाचारमुक्त नाशिक’ घडविण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन पोलीस आयुक्त कर्णिक यांनी केले आहे.