नाशिक शहर: विषारी सुंदरीच्या जाळ्यातून सुटका!
तरुणाईला वाचवण्यासाठी कर्णिकांचे प्रयत्न: अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र
लाल दिवा-नाशिक,७:-प्रतिनिधी) – नाशिक शहरात अलीकडेच पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात केलेल्या धडक कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, विषारी विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने, पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली, चोहोबाजूंनी जाळे पसरले आहे. या पथकात API सचिन चौधरी, विशाल पाटील, ASI गायकर, बेंडाळे, ताजणे, पो. हवा. डंबाळे, कोल्हे, पो. अंमलदार सानप, येवले, बागडे, वडजे, नांद्रे आणि महिला अंमलदार अर्चना फड यांचा समावेश आहे. या जाळ्यात गेल्या काही दिवसांत अनेक विषारी साप अडकले असून, त्यांच्या माध्यमातून मोठा कट उघड झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या धडक कारवाईत पोलिसांनी भांगेच्या गोळ्यांचा एक मोठा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. गायत्रीनगर, आंबेडकरवाडी येथे २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल ₹६,७२,१९८ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई म्हणजे पोलिसांच्या शौर्याचे आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे. पोलीस आयुक्त कर्णिक यांनी या कारवाईचे विशेष कौतुक केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहिल, असे आश्वासन दिले आहे.
याशिवाय, पोलिसांनी एम.डी. ड्रग्स विक्री करणाऱ्यांवरही धाड टाकली आहे. १२ फेब्रुवारी रोजी पखाल रोड, रॉयल कॉलनी येथे एकाला अटक करून ₹१,४२,८९० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, १० फेब्रुवारी रोजी म्हाडा बिल्डिंगजवळ, पंचवटी येथेही अशीच कारवाई करून एक आरोपीला अटक करण्यात आली असून, ₹७२,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई म्हणजे नाशिक शहर पोलिसांचे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे आणि त्यांच्या टीमचे, एक मोठे यश असून, यामुळे तरुण पिढीच्या भवितव्यावर सावट टाकणाऱ्या या दुष्ट शक्तींना चाप बसण्यास मदत होणार आहे. नाशिक शहर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलिसांनी यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करून नाशिक शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करावे, अशी अपेक्षा आहे.