कर्जासाठी लाच: शेतकऱ्याच्या सापळ्यात वणीचा तलाठी गारठला!
१०,००० चा सापळा, अन् फसला लाचखोर!
लाल दिवा-नाशिक,दि.२६:- (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कसबे वणी (ता. दिंडोरी) येथील तलाठी शांताराम पोपट गांगूर्डे (वय ५१) यांना लाच स्वरूपात १०,००० रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरवारी रंगेहात अटक केली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेले प्रशासनच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकल्याचे यानि स्पष्ट होते.
एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या मालकीच्या गट क्रमांक ६१७ च्या जमिनीवर कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी गांगूर्डे यांच्याशी संपर्क साधला होता. गांगूर्डे यांनी सुरुवातीला तक्रारदाराला दिंडोरी तहसील कार्यालयात पाठवत वेळकाढूपणा केला. तिथे गेल्यावर काही नोंदी गांगूर्डे यांच्याकडे असल्याचे कळाल्याने शेतकरी पुन्हा त्यांच्याकडे गेला. यावेळी संधीचा फायदा घेत गांगूर्डे यांनी जमिनीच्या कागदपत्रांमध्ये काही बनावट त्रुटी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना भीती दाखवली. तसेच, त्या दुरुस्त करण्यासाठी १०,००० रुपयांची लाच मागितली.
या अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेत शेतकऱ्याने नाशिक एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून मंगळवारी गांगूर्डे यांना त्यांच्या कार्यालयात शेतकऱ्याकडून १०,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
या कारवाईत एसीबीचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे आणि चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांचा समावेश होता.
याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शेतकऱ्यांच्या शोषणाचे आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराचे एक भयावह उदाहरण आहे.
- नागरिकांना आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी लाच मागत असेल तर त्यांनी घाबरू नये तर धैर्य दाखवत नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (दूरध्वनी क्रमांक- ०२५३२५७८२३०, टोल फ्री क्रमांक १०६४) संपर्क साधावा.