शिरपूर तालुक्यात गुटखा तस्करांकडून दोन कोटी 54 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश…!
लाल दिवा-धुळे,ता.४:- मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणारी गुटख्याची तस्करी रोखण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे .या कारवाईत पोलिसांनी तब्बल दोन कोटी ५४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखू असा ऐवज जप्त केला असून चार ट्रक देखील जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के के पाटील यांना इंदोर कडून धुळ्याकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरून ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा मोठा साठा जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, आणि उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर शिरपूर तालुक्यातील शहादा फाटा नजीक सापळा लावून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी पोलीस पथकाने इंदोर कडे कडून धुळ्याकडे येणारे एम एच 18 बी झेड 0728 क्रमांकाचा ट्रक अडवला .या ट्रकचा चालक नंदलाल सिताराम पाटील आणि क्लीनर प्रदीप दगा सोनवणे यांची चौकशी सुरू करण्यात आली. या दोघांनी संशयित माहिती देत असल्याचे निदर्शनास आल्याने गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये 85 हजाराची प्रतिबंधित सुपारी आढळून आली.
दरम्यान शिरपूर शहादा रोड वरील अर्थेनजीक हॉटेल साई जवळ पोलीस पथकाने आणखी तीन ट्रक अडवल्या. यूपी 70 जीटी 221 आणि जी जे 12 एयू 98 86 तसेच जी जे 27 एक्स 76 82 असे तीन ट्रक अडवून त्यांची तपासणी करण्यात आली. या तीनही गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखू आणि सुपारी आढळून आली. यात यूपी 70 जीटी 0 221 या गाडीमधून 64 लाख 62 हजार रुपये किमतीचा ईगल हुक्का तंबाखू , 16 लाख 40 हजार रुपये किमतीच्या तंबाखूचा साठा देखील आढळला. यात एक कोटी अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ट्रक क्रमांक जी जे 12ए 98 96 यातून 34 हजाराची प्रतिबंधित तंबाखू तसेच 35 लाख 13 हजार रुपये किमतीचा विमलपाल मसाला आणि दोन लाख 24 हजार रुपये किमतीचा तंबाखूचा साठा तसेच एक लाख 94 हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला आढळून आला.
तिसर्या कारवाईत एक लाख 71 हजार रुपये किमतीची व्ही1 टोबॅको, तीन लाख 14 हजार रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू, 28 लाख 26 हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि नऊ लाख 33 हजार रुपये किमतीचा पान मसाला असा ट्रकसह 62 लाख 45 हजार 944 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या सर्व कारवाई मधून दोन कोटी 54 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच या कारवाईत नंदलाल सिताराम पाटील, प्रदीप सोनवणे, शहादाब अब्दुल हनीफ, मोहम्मद जिसान अब्दुल हनीफ, सरवर खान मोमीन खान, साहे अहमद असीन या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.