नात्यांचे महत्त्व ओळखून नात्यांचे वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे आवश्यक…!
लाल दिवा :
नाते ही संकल्पना आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असते. मानवी मूल्य अबाधित ठेवण्यासाठी नात्यांची गरज असते. माणसामाणसांमधील नातेसंबंधही एका परीने माणुसकीवरील श्रद्धेतून निर्माण होत असतात. नाती ही जोडण्यासाठी असतात. तोडण्यासाठी नाहीत, ही आंतरिक तळमळ लेखक, वक्ते विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केली.
नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि युवा साहित्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिडको वसंत व्याख्यानमालेतील चौथे पुष्प कै. पोपटरावजी हिरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित व्याख्यानात ते ‘नात्यांचे सर्विसिंग’ या विषयावर बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून
ठाकूर म्हणतात की, आमदार सीमा हिरे, महेश हिरे, सुरेश कांबळे, प्रशांत पाटील, ओमप्रकाश शर्मा आणि सुभाष सबनीस उपस्थित होते
नाती विविध प्रकारे तयार होत असतात. ही नाती रक्ताने, परिचयातून, सहवासातूनही तयार होत असतात. सर्वच नात्यांमध्ये परस्परांविषयीचा प्रेम, जिव्हाळा आणि वर्तनातला प्रांजळपणा हवा असतो; परंतु मानवी स्वभावाचा, वृत्तींचा, हेतूंचा थांग कधीकधी लागत नाही आणि विपरीत वर्तनाचा प्रत्यय येतो. नात्यांना सातत्याने गृहीत धरले जाते आणि मग जो अनुभव येतो त्यानंतर विविध परिणाम घडून येतात ते म्हणजे माणसांना आणि त्यांच्यातल्या नात्यांना धक्का बसतो, ती हादरून जातात, कित्येकदा कोसळून पडतात. अशावेळी नाती तुटताना सुद्धा दिसून येतात. याचे कारण नात्यांना उजाळा दिला जात नाही, नात्यांची कदर न करता नात्यांना तुच्छ लेखले जाते. अहंकाराने नात्याची वीण उसवायला लागते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, नात्यांचे सर्व्हिसिंग केले जात नाही, तसे ते करायचे असते याची जाणीवही कित्येकांना नसते. नाती जपण्यासाठी, संवादित राहण्यासाठी आणि अर्थात अबाधित राहण्यासाठी नात्यांचे महत्त्व ओळखून नात्यांचे वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. अन्यथा एकवेळ अशी येते जेव्हा खंत आणि पश्र्चाताप करण्यावाचून काहीही उरत नाही. असेही विश्वास ठाकूर यांनी विवेचन करताना सांगितले. तसेच त्यांनी त्यांच्या ग्रंथाविषयी बोलताना सांगितले की, जीवनाच्या वाटचालीत भेटलेली अनेक माणसे त्यांचे मोठेपण आणि त्यांच्याकडून मिळालेली जीवन जगण्याची प्रेरणा ही शिदोरी घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. त्या वाटचालीचे प्रामाणिक कथन म्हणजे ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हा कथासंग्रह आहे. जीवन जगण्याची कला ही सकारात्मकतेतून आनंद देत असते. त्याचीच मी कथा संग्रहात गुंफण केली आहे. गेल्या पंचवीस वर्षातील सहकार क्षेत्रात काम करत असतांना आलेल्या विविध प्रेमळ पंचवीस आठवणींचा काही कटू अनुभवांचा हा शब्दांचा गुच्छ आहे. त्यातून जीवन प्रवासाचा आलेख रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग म्हणजे ह्या कथा संग्रहाचा प्रवास आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्दन माळी यांनी केले तर वक्त्यांचा परिचय रविकांत शार्दुल यांनी करून दिला. सूत्रसंचालन किरण सोनार यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर पाटील यांनी मानले.