जरांगेना आम्हीं नेता मानत नाही : ॲड. पुरुषोत्तम खेडेकर….!
लाल दिवा-नाशिक,ता .२० :- मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, ही मराठा सेवा संघाची आधीपासूनची मागणी आहे. तीच मागणी मनोज जरांगे पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांच्या या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे; मात्र जरांगेंना आम्ही नेता मानत नाही, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. अॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी शुक्रवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईच्या आंदोलनाला सेवा संघाचे कार्यकर्ते पाठविण्याबाबत अद्याप ठरले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, महासचिव चंद्रशेखर शिक्रे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. खेडेकर म्हणाले की, मराठवाडा वगळता विदर्भासह राज्यातील बहुतांश मराठे कुणबी आहेत. इंग्रजी राजवटीपासून त्यांच्या नोंदी आहेत; परंतु मराठवाड्यात गंभीर परिस्थिती असून, हा भाग अधिक मागासलेला आहे. त्यामुळे आता राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या, तरी यात मराठवाड्यातील काही हजारच नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून सविस्तर सर्वेक्षण करून मागास सिद्ध झाले, तर संवैधानिक मागनि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, ही आमची आधीपासूनची मागणी आहे, असेही खेडेकर यांनी सांगितले.