कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे यश; पंचवटी हादरली, सात जणांना जन्मठेप
कड यांच्या नेतृत्वात तपासाला यश; न्यायालयाने ठोठावले कडक पाऊल
लाल दिवा-नाशिक,दि.१५
: पंचवटी पोलीस ठाण्यातील २०१८ साली घडलेल्या एका भयावह खून खटल्यात मा. जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना जन्मठेप आणि तीस हजार रुपयांच्या दंडाची कडक शिक्षा सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुधकर कड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी केलेल्या धडाकेबाज तपासाचे हे निश्चितच फळ आहे.
दिनांक १३ जून २०१८ रोजी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मणनगर येथे झालेल्या मारहाणीत अनिल गुंजाळ या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर सागर माने या तरुणाला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी जयराम गायकवाड, दशरथ गायकवाड, श्रीराम गायकवाड, सुरज गायकवाड, अंबिका पवार, संदिप पवार आणि राहुल पवार अशा सात जणांना अटक केली होती.
पोलिसांनी केलेल्या बारकाईने तपासातून असे निष्पन्न झाले की, जुन्या वादातून आरोपींनी अनिल गुंजाळ यांच्यासह तिघांवर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब), भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
तपास अधिकाऱ्यांनी अतिशय चिकाटीने आणि बारकाईने तपास करून आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. मा. जिल्हा सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी यांनी फिर्यादी, साक्षीदार आणि तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सातही आरोपींना भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ आणि १२० (ब) अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, इतर कलमांखाली देखील त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत.
या खटल्यात सरकारी पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस. एस. गोरवाडकर आणि डॉ. सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले. तर, कोर्ट पैरवी अंमलदार मधुकर पिंगळे आणि एस. टी. बहीरम यांनी या खटल्यात शिक्षा होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त संदीप मिटके, पद्मजा बढे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुधकर कड यांनी तपास अधिकारी आणि कोर्ट अंमलदाराचे या यशस्वी कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये नक्कीच दहशत निर्माण होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.