पेपर विक्रेत्यापासून पीएचडी प्राध्यापकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!
डॉ. दत्ता गुजराथी यांची यशोगाथा
लाल दिवा-सिन्नर,दि.८:- चार दशकांपूर्वी सिन्नरच्या गल्लीबोळात सायकलवरून पेपर टाकणारा एक शालेय विद्यार्थी आज उच्चशिक्षण क्षेत्रात एक नावारूपाला आलेला प्राध्यापक म्हणून ओळखला जातो. ही यशोगाथा आहे डॉ. दत्ता मनोहर गुजराथी यांची.
कमी वयातच कुटुंबाची जबाबदारी उचलत दत्तांनी पेपर विक्रीसोबतच रद्दी पेपर गोळा करून शालेय खर्च भागवला. शेठ ब.ना. सारडा विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. शाळेतील अभ्यासात ते हुशार होतेच, पण व्यवहारातील गणितातही ते पारंगत होते. त्यांच्या याच गुणांमुळे त्यांनी कमी वयातच छोटा-मोठा व्यवसाय सुरू केला.
वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर परिस्थिती हलाखीची झाली तरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी ‘कमवा आणि शिका’ या धोरणाला प्राधान्य दिले. याच काळात दत्तांनी मसाल्याच्या पुड्या बांधण्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावला. एसएससी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आणि कॉमर्सचे क्लासेस घेऊन स्वतःचा खर्च भागवला. त्यांच्या सोप्या आणि रंजक अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात रस निर्माण झाला.
बी.कॉम मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर दत्ता यांची सटाणा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नंतर संगमनेर महाविद्यालयात ते रुजू झाले. अध्यापनाबरोबरच त्यांनी संशोधनात रस घेतला आणि पुणे विद्यापीठातून पीएचडी ही पदवी संपादन केली. त्यांनी विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केले आणि अनेक विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले.
सेवानिवृत्तीपूर्वी त्यांनी नाशिकच्या अशोका बिजनेस स्कूलचे संचालकपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात या संस्थेत १००% प्लेसमेंटचे उद्दिष्ट साध्य झाले. विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय आणि वाचनालयाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
डॉ. दत्ता गुजराथी यांची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन हे खऱ्या अर्थाने संघर्ष आणि यशाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचा मुलगा चि. सागर यांनी सनदी लेखापाल (सीए) होऊन त्यांचे स्वप्न पूर्ण केले. आज डॉ. दत्ता गुजराथी आपल्या कुटुंबासह एक समृद्ध आणि समाधानी जीवन जगत आहेत. त्यांच्या प्रवासातील प्रत्येक टप्पा हा कष्ट, चिकाटी आणि जिद्दीचा परिणाम आहे