समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण ..!

लाल दिवा-नाशिक,ता.३ :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सोमवार, दि. ४ मार्च रोजी होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा असून, सकाळी ११.०० वाजता इगतपुरी पथकर प्लाझा, मौजे नांदगाव सदो., ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे.

या तिसऱ्या टप्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील 24.872 कि.मी लांबी एकूण 16 गावातून जात असून पॅकेज 13 अंतर्गत 23.251 कि.मी व पॅकेज 14 अंतर्गत 1.621 कि.मी लांबीचा समावेश आहे. या टप्प्यात पॅकेज 13 अंतर्गत 1 व्हायाडक्ट (200 मी लांबी), दारणा नदीवरील 1 मोठा पूल (450 मी), 8 छोटे पूल, वाहनांसाठी 5 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 8 भुयारी मार्ग, 9 ओव्हरपास, पथकर प्लाझा वरील 4 इंटरचेज, 14 टोलबूथ, 2 वे-ब्रिज, 1 टनेल-275 मी, 27 बॉक्स कल्वर्ट, 27 युटीलीटी डक्ट व पॅकेज 14 अंतर्गत 1 व्हायाडक्ट (910 मी लांबी), आदी सुविधांचा समावेश आहे.

 

प्रकल्पाच्या या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये 1078 कोटी असून या टप्प्याच्या लोकार्पणामुळे 701 कि.मी पैकी आता एकूण 625 कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालेला आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतीपथावर आहे.

इगतपुरी इंटरचेंजचा वापर करुन ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल व 1 तासात शिर्डीला पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!