नाशिकरोडमध्ये धक्कादायक प्रकार: सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; वपोनि गिरी यांच्या निर्देशानुसार आरोपीला तात्काळ अटक
नाशिकरोडमध्ये हादरवणारी घटना: सावत्र बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लाल दिवा-नाशिक,दि.२३:-नाशिकरोड – येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, आरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून पीडितेचा सावत्र बापच असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक गिरी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता फिर्यादी ही आपल्या घरासमोर भांडी धुत होती. यावेळी तिचे वडील म्हणजेच आरोपी हा घरात दूरदर्शन पाहत होता तर आई किराणा सामान आणण्यासाठी दोन लहान मुलींसह बाहेर गेली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने फिर्यादीला घरात बोलावले आणि घराचा दरवाजा आतून बंद करून तिला वरच्या मजल्यावर नेले. तेथे त्याने पीडित मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
पीडित मुलीने रडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला व तिच्या आईसह बहिणींना जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गिरी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पीडितेचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या निर्देशानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०१/२०२४ अंतर्गत भादंवि कलम ३५४(३), ३७६ सह पॉक्सो कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी लगेचच कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत.