अधिकारांच्या अंगणात लोकशाहीची होळी! येवला प्रशासनाने जनतेच्या तोंडाला बांधली दगडी शांतता!
- येवला प्रशासन ‘गायब’, जनतेचा संताप अनावर!
- शिवसृष्टीचा सोहळा अन् उपस्थितीचे वादळ!
लाल दिवा-येवला,’दि.४: शिवसृष्टीचा भव्यदिव्य सोहळा, राजकीय दिग्गजांची उपस्थिती, जनसमुदायाचा उत्साह… पण या साऱ्या दिमाखदार पडद्यामागे लपली होती प्रशासकीय बेजबाबदारपणाची काळीकुट्ट रात्र! येवला नगरपालिका प्रशासनाने या सोहळ्याला दिली ती दांडी मारून नाही, तर जनभावनेचा अनादर करून, लोकशाहीच्या मुळावर घाव घालून!
मुख्याधिकारी आणि उपमुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही केवळ एक घटना नाही, तर व्यवस्थेतील गाभारा उघड करणारा भयानक प्रकार आहे. एकीकडे राज्याचे कर्णधार उपस्थित आहेत, तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन मात्र ‘गायब’! ही केवळ बेजबाबदारपणाची परिसीमा नाही तर जनतेला अंधारात ठेवण्याचा डाव आहे.
काही दिवसांपूर्वीच होर्डिंग्ज परवानगी प्रकरणात उपमुख्याधिकाऱ्यांवर राजकीय पक्षपातीपणाचे आरोप झाले होते. त्याची चौकशी पूर्ण होण्याआधीच मुख्याधिकारी देखील ‘गायब’ झाल्याने संशयाचे भोवरे अधिकच दाटले आहेत. बेरोजगार होर्डिंग्ज काढण्यासाठी मोहीम राबविण्याचे आश्वासन देऊनही मुख्याधिकारी शब्द खरे ठरवू शकले नाहीत. उलट पोलीस बंदोबस्त मिळताच ते स्वतःच ‘गायब’ झाले.
ही प्रशासकीय अराजकता येवल्यातील जनतेला अस्वस्थ करणारी आहे. मुख्याधिकारी नेमके कुणाच्या दबावाखाली काम करतात? या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची हिंमत कोण दाखवणार? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत येवल्यातील जनतेचा रोष शांत होणार नाही. लोकशाहीच्या मंदिरात अशा प्रकारे गर्दुल्ल्यांना प्रवेश मिळत राहिला तर या व्यवस्थेचे काय होणार ?