आरोग्यदायी “मुत्रपिंड” म्हणजे निरोगी शरीर ‘ वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिल पवार ; जागतिक मूत्रपिंड दिवस साजरा….!
लाल दिवा-नाशिक, दि .१४:- मानवी शरीराला योग्यरितीने काम करण्यासाठी किडनीची म्हणजेच मूत्रपिंडाची आवश्यकता असते. आरोग्यदायी मुत्रपिंड म्हणजे निरोगी शरीर, हे समीकरण आहे. म्हणूनच किडनी (मूत्रपिंड) विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक किडनी दिन म्हणजे मूत्रपिंड दिन साजरा केला जात असल्याचे विभागीय संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिल पवार यांनी सांगितले.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या मूत्रपिंड विभागात जागतिक मूत्रपिंड दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सावंत, मूत्रपिंड विकार तज्ञ डॉ. चारुदत्त चाफेकर व डॉ. पार्थ देवगावकर तसेच इतर सर्व वर्ग १ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका अधीक्षिका, परिचारिका उपअधीक्षिका, सर्व विभागाच्या परीसेविका व अधिपरिचारिका, डायलिसिस तंत्रज्ञ, वर्ग चार कर्मचारी हजर होते.
यावेळी डॉ.पवार म्हणाले की, सध्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे जगभरातील लोक किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. साधारणपणे वृद्ध व्यक्ती आणि मधुमेहाने त्रस्त लोकांच्या मूत्रपिंडावर जास्त परिणाम होतो. मूत्रपिंडाचा कोणताही आजार झाला की त्याचा परिणाम एकूण आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवाबद्दल लोकांना जागरुक करणे अत्यंत गरजेचे आहे.
जागतिक किडनी दिवस प्रत्येक मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. मूत्रपिंड रुग्ण कक्ष, मूत्रपिंड अति दक्षता कक्ष, डायलिसिस कक्ष हे सर्व विभाग अतिशय कल्पकतेने सजवण्यात आले होते व या ठिकाणी रांगोळी प्रदर्शन तसेच पोस्टर प्रदर्शन करून, आपल्या मूत्रपिंडाची आपण काळजी कशी घ्यायची असते याची रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी माहिती उपलब्ध करून देण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मूत्रपिंड विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.