उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग……..लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण काम असलेल्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे घाईघाईत करण्यात आले लोकार्पण…..!

लाल दिवा-नाशिक,ता ४ :-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते इगतपुरी पथकर प्लाझा, मौजे नांदगाव सदो (तालुका इगतपुरी) येथे आज करण्यात आले.

 

  • समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार : मंत्री छगन भुजबळ

रस्त्यांमुळे जिल्हा, राज्य व देशाचा विकास साधला जात असतो. या अनुषंगाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे, असा विश्वास यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 520 कि.मी.चे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुंबई ते नागपूर दरम्यान असणारा हा समृद्धी महामार्ग शेतमालाची वाहतूक करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचप्रमाणे या महामार्गावर वाहने चालवताना नियमांचे पालन करणे आवश्यक असून त्यासाठी एक दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

  • वेळेची बचत करणारा समृद्धी महामार्ग : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

समृद्धी महामार्ग हा अतिशय सरळ व सोपा असून मुंबई ते नागपूर या मुख्य शहरांसोबतच 15 जिल्ह्यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे वेळेची मोठी बचत होणार असल्याचे सांगून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, देशाचा होणारा विकास हा HIRA (Highways, Infrastructure development, Railways & Airways) डेव्हलपमेंट म्हणून होत आहे. या चारही माध्यमातून देशाच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील समृद्धी महामार्गाची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या.

 

  • समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाला हातभार : पालकमंत्री दादाजी भुसे

समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मुंबई ते नागपूर दरम्यान असणाऱ्या 701 कि.मी. लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामांपैकी 625 कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आज तिसऱ्या टप्प्यातील भरवीर ते इगतपुरी या 25 कि.मी. रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. या महामार्गाच्या माध्यमातून पर्यटन व तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. समृद्धी महामार्गावर अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. या महामार्गाचा वापर करताना वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे व वाहनाच्या वेगाचे पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

 

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित 25 कि. मी. मार्गाचे म्हणजेच इगतपुरी ते आमने येथील काम प्रगतीपथावर आहे. त्याच प्रमाणे या महामार्गावर उभारण्यात आलेल्या टोलनाका व इतर 18 ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक नागरिकांचा रोजगाराच्या दृष्टीने समावेश करण्यासाठी प्राधान्य येणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे ते म्हणाले.

 

यावेळी आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, समृद्धी महामार्गाचे सह व्यवस्थापक कैलास जाधव, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, उपजिल्हाधिकारी तथा उप व्यवस्थापक विठ्ठल सोनावणे, तहसीलदार तथा व्यवस्थापिका रचना पवार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

 

प्रास्ताविकात अनिलकुमार गायकवाड यांनी संपूर्ण समृद्धी महामार्गाबद्दल व त्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आवश्यक सोयी सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली. आभार कैलास जाधव यांनी मानले.

 

  • असा आहे समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा….

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे तिसरा टप्पा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील 24.872 कि.मी लांबी एकूण 16 गावातून जात असून पॅकेज 13 अंतर्गत 23.251 कि.मी व पॅकेज 14 अंतर्गत 1.621 कि.मी लांबीचा समावेश आहे. या टप्प्यात पॅकेज 13 अंतर्गत 1 व्हायाडक्ट (200 मी लांबी), दारणा नदीवरील 1 मोठा पूल (450 मी), 8 छोटे पूल, वाहनांसाठी 5 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 8 भुयारी मार्ग, 9 ओव्हरपास, पथकर प्लाझा वरील 4 इंटरचेज, 14 टोलबूथ, 2 वे-ब्रिज, 1 टनेल-275 मी, 27 बॉक्स कल्वर्ट, 27 युटीलीटी डक्ट व पॅकेज 14 अंतर्गत 1 व्हायाडक्ट (910 मी लांबी), आदी सुविधांचा समावेश आहे. या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये 1078 कोटी असून या टप्प्याच्या लोकार्पणामुळे 701 कि.मी पैकी आता एकूण 625 कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला.

 

 

 

 

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!