भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत :- जितीन रहमान…!
लाल दिवा-नाशिक, दि,,१ :- प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक कार्यालयांतर्गत येणारे नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड, येवला, दिंडोरी, इगतपुरी, पेठ तालुक्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक जितीन रहमान यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक कार्यालयांतर्गत येणारे नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड, येवला, दिंडोरी, इगतपुरी, पेठ तालुक्यात सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांना भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज (नवीन तथा नुतनीकरण), शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क आणि सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रणाली 11 ऑक्टोबर 2023 पासून कार्यान्वित झालेली आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरून आपले अर्ज महाविद्यालयीन स्तरावर सादर करावे. यासाठी महाविद्यालयांनी सूचना फलकावर सुचना लावून तसेच वर्गांमध्ये नोटीस फिरवून विद्यार्थांना याबाबत अवगत करावे. अनुसूचित जमातीचे विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनांपासून वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयाची राहील, असेही सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक जितीन रहमान यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.