हिंदुस्तान पेट्रोलियमच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; नाशिकचा एक आरोपी ताब्यात
बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखोंचा गंडा
लाल दिवा-नाशिकसिडको, ता. १२ (प्रतिनिधी)- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावाखाली भिंड जिल्ह्यातील एका व्यक्तीची नाशिकच्या दोघांनी तब्बल तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नाशिकच्या निलेश शिंदे यास अटक केली असून, त्याचा साथीदार नितिन काळे हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
फिर्यादी कौशलेन्द्र सिंह कुशवाह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी निलेश शिंदे आणि नितिन काळे यांनी स्वतःला हिंदुस्तान पेट्रोलियममधील अनुक्रमे मुख्य मानव संसाधन व्यवस्थापक (एचआर मॅनेजर) आणि उपव्यवस्थापक (डेप्युटी मॅनेजर) म्हणून ओळख करून दिली. इटावा-ग्वालियर महामार्गाजवळील एका जमिनीवर गोडाऊन उभारण्यासाठी कंपनीला जागा भाड्याने घ्यायची असल्याचे त्यांनी कुशवाह यांना सांगितले. या जमिनीसाठीचे कथित लँड अप्रूव्हल आणि फर्स्ट इन्फॉर्मेशन लेटर दाखवत त्यांनी कुशवाह यांचा विश्वास संपादन केला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी कुशवाह यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले.
मात्र, काही दिवस उलटूनही काहीच हालचाल न झाल्याने कुशवाह यांना संशय आला. त्यांनी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या भोपाल कार्यालयाशी संपर्क साधला असता, शिंदे आणि काळे यांचा कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच, त्यांनी दाखवलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कुशवाह यांनी पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांनी आरोपी निलेश शिंदे आणि नितिन काळे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४६७ (मूल्यवान सुरक्षा बंधपत्र, विल इ.ची जालसाजी), ४६८ (फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागदपत्र तयार करणे) आणि ४७१ (बनावट कागदपत्र खरे म्हणून वापरणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी नुकतेच संशयित आरोपी निलेश शिंदे यास ताब्यात घेतले असून, नितिन काळे याचा शोध सुरू आहे. या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिस करत आहेत. तसेच, या आरोपींनी आणखी कुणाची फसवणूक केली आहे का, याचाही तपास सुरू आहे.