पालकमंत्री भुसेंनी मानले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार; नारपार योजनेमुळे शेतकरी होणार सुजलाम सुफलाम ….!
लाल दिवा-नाशिक,ता.१०:- उत्तर महाराष्ट्राला जलस्वयंपूर्ण करणाऱ्या नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी मंजुरी दिल्याने कसमादेसह खान्देशातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा प्रकल्प व्हावा यासाठी मंत्री दादाजी भुसे यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बैठका घेत वरिष्ठ स्तरावर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. या मंजुरीनंतर मंत्री भुसे साहेब यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आभार व्यक्त केले आहेत.
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला मा. राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे. नारपार योजनेमुळे शेतकरी हा सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांच्या संघर्षाला न्याय महायुती सरकारने दिला असून आजपर्यंत अनेकांनी राजकारण केले मात्र आपल्या सरकारने न्याय दिल्याचे प्रतिपादन मंत्री भुसे यांनी केले. या मंजुरीबद्दल मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे ना. दादाजी भुसे यांनी आभार मानले. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, सटाणा, नांदगाव व इतर तालुक्यांना होणार आहे. 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. सुमारे 7015 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास जाऊन मिळणाऱ्या नार-पार व संभाजीनगर या तीन पश्चिम वाहिनी नद्यांवर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात ९ धरणे बांधून या धरणातून पाणी उपसा करून गिरणा उपखोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित करण्यात आले. या योजनेतून नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा व मालेगाव तालुक्यांतील २५ हजार ३१८ हेक्टर, जळगांव जिल्ह्यातील १७०२४ हेक्टर अशा एकूण ४२ हजार ३४२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. यात कळवण तालुक्यातील ८ गावे, देवळ्यातील २१ गावे, मालेगाव तालुक्यातील २२ गावे, भडगाव तालुक्यातील २३ गावे, एरंडोल तालुक्यातील २२ गावे, चाळीसगाव तालुक्यातील दोन गावांना लाभ होणार आहे. प्रकल्पाची किमत ७०१५ कोटी आहे.
या बहु प्रतिक्षित महत्वकांक्षी प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांचे भुसे साहेबांनी आभार मानले.