माजी मंत्री घोलप यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भेट…!
लाल दिवा-नाशिक रोड,ता.२: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री नेते आणि उपनेते बबनराव घोलप यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली या भेटीदरम्यान केवळ चर्मकार समाजाचे प्रश्नांवर चर्चा झाल्याचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी सांगितले आहे.
नुकतीच मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बबनराव घोलप यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बबनराव घोलप शिंदे गटात जाणार? की ठाकरे गटातच राहणार? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. येणारी शिर्डीची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी बबनराव घोलप यांचे सुपुत्र माजी आमदार योगेश घोलप सध्या लॉबिग करताना दिसत आहे. भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे निवडणूक लढवण्यासंबंधी बबनराव घोलप यांना कोर्टाने अजूनही हिरवा कंदील दिलेला नसल्यामुळे सध्या तरी त्यांचे सुपुत्र योगेश घोलप हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. मात्र देवळाली मध्ये विधानसभा लढायची की लोकसभेचे तिकीट घेऊन शिर्डीतून नशीब आजमावायचे यासाठी घोलप कुटुंबीय सध्या राजकीय आखणी करताना दिसत आहे. दरम्यान बबनराव घोलप यांची कन्या तनुजा घोलप या भारतीय जनता पक्षात देवळाली मतदारसंघाच्या उमेदवार समजल्या जातात. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
तीस वर्ष देवळाली मतदारसंघाची आमदारकी बबनराव घोलप यांच्या घरात होती. २५ वर्ष बबनराव घोलप आणि त्यानंतर पाच वर्ष त्यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना मतदारांनी निवडून दिले होते त्यानंतर आमदार सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विजयश्री खेचून आणला. येणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बबनराव घोलप यांनी राजकीय व्यवहारचना अखल्याचे बोलले जात आहे.
- प्रतिक्रिया
मी माझ्या समाजाची काही प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही शिवाय समाजाच्या अनेक योजना अनेक वर्षापासून बंद आहे त्या सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच बैठक लावणार आहे त्यासंबंधी माझी भेट होती इतर पक्षात जायचे असल्यास वाजत गाजत जाईन. – बबनराव घोलप माजी मंत्री