निवडणुकीच्या रणधुमाळीत भडकले प्रक्षोभक भाषण! वक्त्यासह आयोजकावर गुन्हे
लाल दिवा-नाशिक,दि.१०:– निवडणुकीच्या आडोळ्यात आचारसंहितेचे धिंडवडे उडवत एका महिला वक्त्यानं केलेलं प्रक्षोभक भाषण चांगलंच महागात पडलं आहे. नाशिकच्या नेहरू गार्डनमधील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ९ नोव्हेंबरला “हिंदू युवा जागरण” या कार्यक्रमात वक्त्या हर्षाताई ठाकुर यांनी दोन समाजांमध्ये आग लावण्यासारखं भाषण केल्याचा आरोप आहे. यामुळे त्यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक अक्षय भडांगे यांनाही पोलीसांच्या रडारवर यावं लागलं आहे. भद्रकाली पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला असून, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हर्षाताई ठाकुर यांनी केलेलं भाषण इतकं प्रक्षोभक होतं की त्यामुळे दोन समाजांमध्ये शत्रुत्व निर्माण होऊ शकत होतं. शिवाय आयोजकांनी परवानगीच्या अटींचे उल्लंघन केलं. त्यामुळे पोलिसांनी भा.दं.वि. १९६, २२३ आणि लोकप्रतिनिधी कायदा १२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आता दोघंही पोलिसांच्या ताब्यात येतील का, हा प्रश्न आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि सपकाळे करत आहेत.
या घटनेमुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. आरोपींना अटक केली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.