नाशिक: ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचेही कौतुक!
नाशिक पोलिसांनी ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ उपक्रमातील शिक्षकांचा केला गौरव!
लाल दिवा-नाशिक,दि,१२ :- नाशिक शहर पोलिस आयुक्तालय आणि नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ (एसपीसी) उपक्रमांतर्गत शिक्षकांचा गौरव सन्मान सोहळा पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आला.
देशभर राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक, शासकीय आणि केंद्रीय अशा २३ शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये शाळेतील जीवनातच नैतिक मुल्ये रुजवून सुसंस्कृत नागरिक घडविण्याचा उद्देश आहे.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी महिला सुरक्षा, वाहतूक नियमांची जनजागृती, पोलिस स्टेशन भेट, ट्रॅफिक पार्क भेट, स्वच्छता अभियान, धूम्रपान निर्मूलन, वृक्षारोपण, शारीरिक कवायत, खेळ, ड्रिल, विविध गुन्हे व शिक्षा यांची माहिती देणे असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.
या उपक्रमाची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मनपा शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुधाकर सुराडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार भगवद्गीता भेट देऊन करण्यात आला. तसेच एसपीसी उपक्रमात सहभागी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त खांडवी यांनी एसपीसी उपक्रमाची व्याप्ती अधिक वाढवण्याचे आवाहन केले. तसेच उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या शिक्षक आणि पोलिस हवालदार सचिन जाधव यांचे कौतुक केले.
शिक्षणाधिकारी पाटील यांनी पोलिस आयुक्तालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस हवालदार सचिन जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भडांगे यांनी केले. आभार प्रदर्शन सुरेश खांडबहाले यांनी केले.
यावेळी शाळा क्रमांक १, ३, ४, २०, २१, २७, २८, ७२, ७३, ८६, ८६ मनपा माध्यमिक विद्यालय सातपूर कॉलनी, अंबड, पाथर्डी गाव, चूंचाळे गाव, म्हसरुळ, नांदुरगाव, शिवाजी नगर, बडी दर्गा, वडाळा गाव, कामटवाडे, रायगड चौक, शासकीय कन्या विद्यालय, केंद्रीय विद्यालय उपनगर, वडनेर गेट या शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.