देवळाली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या……डॉ. राजश्री अहिरराव यांची भाजप प्रवेशाची चर्चा ?
लाल दिवा-नाशिक,ता.७: शासकीय सेवेचा राजीनामा दिलेल्या माजी तहसिलदार डॉ. राजश्री अहिरराव यांनी राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला असून, आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येत्या मंगळवारी (दि. ९) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे . राजश्री अहिरराव यांनी नाशिक येथे तहसिलदार पदावर काम केले असून, त्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क वाढला आहे. त्यातूनच गेल्या विधानसभा निवडणूकीच्या काळातच त्यांना राजकारणाचे वेध लागले होते. त्यासाठी त्यांनी शासनाकडे स्वेच्छानिवृत्ती मिळावी, यासाठी विनंतीही केली. परंतु शासनाने त्यांना निवृत्ती नाकारली होती. दरम्यान, समाज
माध्यमातून अहिरराव यांनी देवळाली
मतदारसंघात जनसंपर्कासाठी विशेष मोहिमेच्या माध्यमातून सामाजिक कामे हाती घेतल्याने राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. एवढेच नव्हे तर विधीमंडळाच्या अधिवेशनातही त्यांनी अहिरराव यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे अहिरराव आणखी प्रकाशझोतात आल्या. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात त्यांनी पुन्हा शासनाकडे राजीनामा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. हा राजीनामा मंजूर करतांना सत्ताधारी व विशेषतः भाजपच्या नेत्यांनी त्यांना मदत केल्यामुळे अहिरराव यांनी समर्थकांसह भाजपात मंगळवार (दि. ९) रोजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.