“मुख्यमंत्री लाडका पत्रकार योजना” सुरू करा ; नमो विचार मंचचें महाराष्ट्र कार्याध्यक्ष, चंदन पवार यांची मागणी….!
लाल दिवा-नाशिक,ता.२५ :- महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना आज आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे, कोरोनाच्या काळात तर पत्रकारांना निम्मा पगार देण्यात आला होता आणि बऱ्याच पत्रकारांना आपली नोकरीही गमवावी लागली आहे, आज जे पत्रकार छोट्या मिडिया हाउस मध्ये उरले आहेत त्यांना तर बातमी आणली तरच मानधन मिळते आहे अश्या पत्रकारांची आज परवड चालली आहे, ज्यांची साप्ताहिके आहेत किंवा लहान दैनिक आहेत अशा संपादकांना तर उपासमारीची वेळ आलेली आहे, पूर्वी शासनाकडून त्यांना जाहिरात मिळत होती परंतु आता ती मिळत नाही, पूर्वी शासनमान्य यादीत नसलेल्या वृत्तपत्रांना देखील शासनाकडून दिपावली, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, एक मे, कामगार दिन महाराष्ट्र दिन या दर्शनी जाहिरात मिळत असत, मागील चार-पाच वर्षापासून अश्या जाहिराती देणे बंद करण्यात आल्या आहेत, या जाहिरातीमुळे वृत्तपत्रांना वार्षिक २० ते २५ हजार रुपयाची मदत मिळत होती.
आर्थिक संकटाना सामोरे जात असलेल्या संपादकांना आणि पत्रकारांना जे शासनमान्य यादीवर आहेत आणि जे शासनमान्य यादीवर नाहीत अशा वृत्तपत्रांना शासनाने जाहिरात देऊन सहकार्य करावे, शासनमान्य यादीवर नसलेले वृत्तपत्र देखील शासनाच्या योजना, धोरण याविषयी जनजागृती व प्रसिद्धीचे काम नित्यनेमाने करीत आहेत, शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या कार्यालयाकडून ज्या बातम्या किंवा प्रेस नोट दिल्या जातात ते लहान लहान वृत्तपत्र प्रसिद्ध करीत असतात.
जे पत्रकार फ्री लान्सर म्हणून स्वतंत्र पत्रकारिता करतात, त्यांना देखील शासनाकडून कुठली मदत होत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे ते संसाराचा गाडा कसा हाकतात याचा विचार न केलेलाच बरा, अशा पत्रकारांना देखील महाराष्ट्र शासनाने योजना आणून दिलासा दिला पाहिजे, तसेच पत्रकारांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते त्यासाठी त्यांना टोल मध्ये सुद्धा सवलत दिली पाहिजे, “मुख्यमंत्री लाडका पत्रकार योजना’ सुरू करून विविध योजना आणून पत्रकारांना दिलासा द्यावा आणि त्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, नमो विचार मंचचें महाराष्ट्र कार्याध्यक्ष, चंदन पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.
संपर्क
चंदन पवार
कार्यकारी अध्यक्ष,
नमो विचार मंच, महाराष्ट्र राज्य
मोबाईल: 9819414137