दांडिया रात्री मैत्रिणीच्या रक्षणासाठी गेलेल्या तरुणाची धुलाई!

सणांच्या काळातही वाढता गुन्हेगारीचा विळखा?

लाल दिवा-नाशिक,दि.७: शहरातील सुमारास धोंगडेनगर परिसरात दसऱ्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या दांडिया रात्रीत एक धक्कादायक घटना घडली. मैत्रिणीसोबत दांडिया खेळण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी प्रेम धेनवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

फिर्यादी हा तरुण आपल्या मैत्रिणीसोबत दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सुमारास धोंगडेनगर येथे दांडिया खेळत होता. त्यावेळी आरोपी प्रेम धेनवाल हा तिथे आला आणि फिर्यादीच्या मैत्रिणीशी जुन्या भांडणाचा मुद्दा उपस्थित करत तिच्याशी हुज्जत घालू लागला. तिला शिवीगाळ करत धक्काबुक्की करू लागला. **याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की,** “फिर्यादीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या आरोपीने त्याच्या छातीवर मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर त्याला पोटात व तोंडावर लाथांनी मारहाण करत हाताच्या चापटीनेही मारले.” 

  • पोलिसांनी पुढे सांगितले की,

यावेळी फिर्यादीची बहीण भांडण सोडविण्यासाठी धावून आली असता, आरोपीने तिला देखील मारहाण करून शिवीगाळ केली. 

या धक्कादायक घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी प्रेम धेनवाल याच्या विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शेजवळ हे तपास करत आहेत. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ७४, ११५ (२), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दसऱ्याच्या सणाच्या काळात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!