गुन्हेगारीच्या अंधारावर पोलिसांचा प्रकाश, कट्ट्यासह कुख्यात गुन्हेगार गजाआड!
मधुकर कड यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेची कामगिरी, कट्ट्यासह गुन्हेगार बेड्या ठोकल्या.
लाल दिवा-नाशिक,दि.५:- (प्रतिनिधी) -गुन्हेगारीच्या विळख्यातून नाशिक शहराला मुक्त करण्यासाठी सतर्क असलेल्या नाशिक पोलीस दलाने पुन्हा एकदा आपली धाडसी वृत्ती दाखवून दिली आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या जागरूक अधिकाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार अक्षय राजेंद्र निकम (वय ३२, रा. अवधुतवाडी, पंचवटी) याला देशी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतुसासह जेरबंद केले. यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला असून, गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) संदीप मिटके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. याच धोरणाचा एक भाग म्हणून, ४ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट १ च्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत एक महत्वाची माहिती मिळाली. अक्षय निकम हा विद्युत नगर परिसरात देशी बनावटीचा पिस्तुल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक विशेष पथक तात्काळ कारवाईसाठी रवाना झाले. सपोनि हेमंत तोडकर, पोहवा महेश साळुंके, रविंद्र आढाव, पोअं नितीन जगताप, विलास चारोस्कर, अप्पा पानवळ, राम बर्डे आणि चालक पोहवा सुकाम पवार यांनी चित्रपटासारख्या शैलीत निकमला गाफील ठेऊन सापळा रचला. निकमला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली असता, त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस सापडले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ३०,५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
निकम याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नाशिकमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा युनिट १ च्या टीमचे कौतुक केले असून, पोउनि चेतन श्रीवंत आणि शरद सोनवणे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच हे शक्य झाल्याचे नमूद केले. नाशिक पोलीस दलाच्या या धाडसी कामगिरीमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.