न्यायालयीन लिपिकाला १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ
न्यायव्यवस्थेला काळीमा: लिपिक लाच प्रकरणात गजाआड
लाल दिवा-नाशिक,दि.१:- (प्रतिनिधी) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नाशिकमध्ये एका मोठ्या कारवाईत न्यायालयीन लिपिकाला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई तक्रारदाराच्या तक्रारीवरून करण्यात आली.
तक्रारदार यांनी त्यांच्या नवीन दाखल फाईलच्या तारखा निश्चित करण्यासाठी आणि सुनावणी प्रक्रियेत अडथळा न येण्यासाठी संबंधित लिपिकाकडे संपर्क साधला होता. या कामासाठी लिपिक सुमंत सुरेश पुराणीक (वय ४०, रा. श्री निधी बंगला, डी जी पी नगर-१, नाशिक) यांनी सुरुवातीला २० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपयांवर तोडगा निघाला. या लाचप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.
दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. यामध्ये पुराणीक हे त्यांच्या कार्यालयात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले.
या प्रकरणात दुसरा आरोपी संदीप मधुकर बावीस्कर (वय ४७, रा. एन ४२, जे.सी. २/२/५ रायगड चौक, सिडको नाशिक) यांनाही अटक करण्यात आली आहे. बावीस्कर हे धर्मदाय उप-आयुक्त कार्यालयात लघुलेखक म्हणून कार्यरत असून, त्यांनी पुराणीक यांना लाच मागण्यास प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक विनोद चैधरी आणि पोलीस शिपाई अनिल गांगोडे यांचा समावेश होता.