व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय विभागाकडून १४५७ पदभरती बाबत दिरंगाई…!
लाल दिवा – नाशिक,२० : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय इन्स्ट्रक्टर पदासाठी 17 ऑगस्ट 2022 मध्ये 1457 जागांसाठी जाहिरात काढली होती. त्याची पूर्व परीक्षा 28 व 29 सप्टेंबर 2022 रोजी पार पडली आणि मुख्य परीक्षा पाच जून ते 13 जून 2023 पर्यंत पूर्ण झाली. मुख्य परीक्षेसाठी एका पदासाठी 850 परीक्षा शुल्क आकारले होते. बेरोजगार विद्यार्थ्यांनी पैशांची जमवाजमव करून पाच ,दहा, पंधरा, वीस पदांसाठी हजारो रुपये भरून परीक्षा दिली.
या जाहिरातीवर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे केस सुरू होती. उच्च न्यायालयाचा 24 ऑगस्ट 2023 ला निकाल आला. त्यामध्ये न्यायालयाने 21 दिवसांची स्थगिती दिली होती तर हे 21 दिवस पूर्ण झाले तरीही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या पदभरतीसाठी कोणतीही पावले उचलताना दिसत नाही. काही विद्यार्थ्यांनी या विभागाला मुंबईला जाऊन निवेदनेही दिली होती. आज जाहिरात येऊन एक वर्ष एक महिना उलटून गेला तरीही पदभरतीस या विभागाकडून दिरंगाई होत आहे. यामुळे चाळीस हजार बेरोजगार गरीब विद्यार्थी भरडले जात आहेत.
त्यामुळे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय विभागाने गरीब बेरोजगार विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन लवकरात लवकर अंतिम यादी लावून पद भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी 40 हजार विद्यार्थ्यांची मागणी आहे.