अनुकंपा उमेदवारांनी नागरिकांना न्याय मिळण्यासाठी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडवी : पालकमंत्री दादाजी भुसे ….! पालकमंत्री यांच्या हस्ते 10 शासकीय विभागातील 42 अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वाटप !
लाल दिवा,नाशिक, दिनांक: 11 मे, 2023
जिल्ह्यातील विविध विभागांच्या अनुकंपा प्रतिक्षा सूचीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वाटप करण्याची प्रक्रीया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे. या अनुकंपा तत्वावर मिळालेल्या नियुक्ती ओदशांच्या माध्यमातून उमेदवारांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून नागरिकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अनुकंपा भरती 2023 नियुक्ती आदेश वाटपाच्या आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंढावरे, जिल्हा पुरवठा अधिकरी रमेश मिसाळ यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात अनुकंपा भरती प्रक्रीया राबविली जात आहे. ही अनुकंपा भरती प्रक्रीया राबविण्यासाठी जिल्हास्तरीय नियुक्ती अधिकारी यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यामुळे अनुकंपा तत्वामधील पात्र उमेदवारांना न्याय मिळाला आहे. नियुक्ती आदेश मिळालेल्या उमेदवारांनी त्यांना मिळालेल्या संधीच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा करण्यावर भर देण्यात यावा. नियमांमध्ये पात्र असलेल्या नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टिने काम करावे, असे सांगून सर्व नियुक्ती आदेश मिळालेल्या उमेदवारांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर फेब्रुवारी, 2023 ते 11 मे, 2023 या कालावधीत साधारण 449 अनुकंपा नियुक्ती आदेशांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती देखील पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
या विभागांनी दिले अनुकंपा नियुक्ती आदेश….
अ.क्र. कार्यालय आदेश वाटप संख्या
1 जिल्हा पुरवठा कार्यालय, नाशिक 12
2 उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक, प्रदेश नाशिक 13
3 अधीक्षक अभियंता, आधार सामग्री पृथ:करण मंडळ नाशिक 01
4 अधीक्षक अभियंता, धरण सुरक्षितता संघटना, नाशिक 02
5 सहजिल्हा निबंधक वर्ग-1 नाशिक 01
6 अधीक्षक अभियंता, (प्रशासन) मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, नाशिक 01
7 अपर आयुक्त आदिवासी विकास, नाशिक 02
8 सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक 03
9 आयुक्त महानगरपालिका, मालेगाव 01
10 नगरपरिषद, इगतपुरी 03
11 नगरपरिषद, येवला 02
12 नगरपरिषद, त्र्यंबक 01
एकुण 42