“मेरी माटी, मेरा देश”अभियानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा
लाल दिवा,नाशिक.दि,८ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांना वंदन करण्यासाठी ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’या घोषवाक्यासह देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, जिल्ह्यात 9 ते 20 ऑगस्ट, 2023 दरम्यान ‘मेरी माटी, मेरा देश’अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान गाव आणि गटस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायत तसेच महापालिका क्षेत्रात आयोजित करण्यात येणार आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देवून नमन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक *‘शिलाफलक’* उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात एक असे शिलाफलक (स्मारक फलक) उभारण्यात येतील. या शिलाफलकांवर देशासाठी बलिदान दिलेल्या स्थानिक शहीद, वीर, स्वातंत्र्य सैनिकांची नावे असणार आहेत. हे शिलाफलक 15 ऑगस्ट पर्यंत उभारुन त्याठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे *‘वसुधा वंदन’* या उपक्रमात प्रत्येक गावात योग्य ठिकाण निवडून तेथे 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्य सैनिक, *‘वीरांना वंदन’* या उपक्रमात जिल्ह्यातील/ कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या वीरांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
*‘पंचप्रण’* (शपथ घेणे) या उपक्रमात प्रत्येक शासकीय कार्यालयात मातीचे प्रज्वलित दिवे हातात घेवून शपथ घ्यावी. *‘ध्वजारोहण’* कार्यक्रमात अमृत सरोवर, शाळा, ग्रामपंचायत अशा एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेवून राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात येणार असून यात स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ यांना सहभागी करून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. प्रत्येक गावस्तरावर 9 ते 15 ऑगस्ट पर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 16 ते 20 ऑगस्ट या कालावधीत महापालिका, नगरपालिका, पंचायतस्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच दिल्ली येथे तयार करण्यात येणाऱ्या ‘अमृत वाटिका’ साठी प्रत्येक गावातील माती एका मातीच्या कलशात तालुकास्तरावर एकत्रित करुन ती माती पंचायत समिती येथे जमा करण्यात येणार आहे. आणि प्रत्येक पंचायत समितीकडून जिल्हा युवक स्वंयसेवकांकडे जमा करुन दिल्ली येथे अमृत वाटिका तयार करण्यासाठी संकलित केली जाणार आहे. दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ‘मिट्टी यात्रा’काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’या वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे.
जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी (जन भागीदारी) https://yuva.gov.in/meri_maati_mera_desh या संकेतस्थळावर लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील, अशी माहिती ही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिली आहे.
मेरी माटी, मेरा देश, अभियानातील पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन, मिट्टी यात्रा व ध्वजारोहण हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वांतत्र्य सैनिक, पत्रकार सामाजिक संस्था यांच्याशी समन्वय साधून हे अभियान उत्तम प्रकारे आयोजित करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. त्याचप्रमाणे गतवर्षाप्रमाणे यावर्षी देखील ‘घरोघरी तिरंगा’अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रम स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.