छगन भुजबळ येवल्यातून सज्ज होणार रिंगणात, २४ ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज
येवला: विकासाचा आवाज पुन्हा एकदा! भुजबळ सज्ज निवडणुकीच्या रिंगणात
लाल दिवा-येवला, दि.२२ ऑक्टोबर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवल्यातून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि राज्याचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ हे येथून पुन्हा एकदा रिंगणात उतरणार आहेत. ते येत्या गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता येवला येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी दिली आहे.
गेल्या २० वर्षांपासून छगन भुजबळ हे येवला-लासलगांव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या काळात त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असून त्यांच्या कामाची दखल घेत जनता पुन्हा एकदा त्यांना निवडून देईल, असा विश्वास अंबादास बनकर यांनी व्यक्त केला आहे.
मंत्री भुजबळ यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता येवला शहरातील संपर्क कार्यालयापासून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली विंचूर चौफुली, फत्तेपूर नाका मार्गे येवला तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे. त्यानंतर तेथे महायुतीतील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री भुजबळ आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एन्झोकेम हायस्कूल मैदान येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ते कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना संबोधित करणार आहेत.
मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारी अर्ज भरण कार्यक्रमास आणि सभेला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी केले आहे.