बोधी वृक्षाच्या फांदी रोपण आधी भुजबळानी बहुजन समाजाची माफी मागावी : वंचित बहुजन आघाडी…!
लाल दिवा -नाशिक ,दि.२२: ना. छगन भुजबळ यांनी नेहमीच जातीपातीचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेतली आहे. मुंबईत २३ नोव्हेंबर १९८७ रोजी मोठ्या प्रमाणात समस्त बहुजन समाज हुतात्मा स्मारकावर जमला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबर १९८७ रोजी तो संपूर्ण परिसर गोमुत्राने स्वच्छ करणाऱ्या ना.भुजबळ यांचे बहुजनांबद्दल काय मत आहे. हे स्पष्ट होते. त्यामुळे बौद्ध स्मारकावर बोधिवृक्ष फांदी लावण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा त्यांना काही अधिकार नाही. त्यांनी आधी बहुजन समाजाची माफी मागावी आणि नंतरच त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजक पद भूषवावे अशी बहुजन वंचित आघाडीची मागणी आहे. तसे न झाल्यास भुजबळ साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचे यजमानपद भुषवू देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. अन्यथा वंचीत बहुजन आघाडी तर्फे भव्य असे आंदोलन छेडुन बहुजन समाजाच्या जिवावर लुटलेली संपत्ती व मान सन्मान उघड्यावर पाडल्याशिवाय वंचीत बहुजन आघाडी शांत बरणार नाही.
मराठा समाजास आरक्षण मिळावे. यासाठी मनोज जरांगे पाटील सद्या राज्याच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी बैठका घेऊन ते मराठा समाजाच्या लोकांमध्ये जागृती निर्माण करीत आहेत.त्यांनी सरकारला २३ ऑक्टोबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर एक सेकंदही थांबणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे. जातीपातीचे राजकारण करतात. म्हणून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले असून त्यांच्यावर ते प्रत्येक ठिकाणी अक्षरशः तुटून पडत आहेत. हे लक्षात घेतले
पाहिजे. मराठा समाज विरुद्ध भुजबळ असा सामना सातत्याने रंगत आहे. जरांगे पाटील यांच्याशी पंगा घेणे भुजबळ यांना महाग पडत असून त्यांचे कट्टर समर्थक जयदत्त क्षीरसागर यांनी भुजबळ यांची साथ सोडली आहे. अनेक मराठा समर्थकही होळकर यांची री ओढतील असे सांगितले जात आहे. जरांगे पाटील यांनी २४ ऑक्टोबरला दिलेला अल्टिमेटम आणि त्याच दिवशी ना.भुजबळ यांच्या नियोजनाखाली नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे केले जाणारे रोपण याला विशेष महत्त्व आहे. बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून येणारे मान्यवर व उपासक बघता ही मराठा समाज विरुद्ध बहुजन अशी तेढ निर्माण करण्याचे व मराठा विरुध्द बहुजन दंगल घडविण्याचे हे षडयंत्र केले जात आहे. तरी बहुजन समाजाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन विनंती करण्यात येते की, या कुठल्याही भुलथापांना बळी पडु नये मराठा समाजाला आरक्षण भेटलेच पाहीजे. ही आमची रास्त भुमीका असुन ना. भुजबळ यांना कुठलाही सपोर्ट किंवा पाठींबा नाही.
खरंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आहेत. त्यांच्याकडे बोधीवृक्षाच्या फांदीरोपण सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी सोपविणे गरजेचे असताना जातीयवादी ना. छगन भुजबळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यामागचे नेमके कारण काय याचा उलगडा होत नाही. विजयादशमीला त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टीमेटमची तारीख संपत आहे. त्यामुळेच त्या दिवशी मराठा समाजाने भुजबळांविरुद्ध रान उठविल्यास बोधीवृक्ष फांदीरोपण महोत्सव कार्यक्रमावर त्याचा विपरित परिणाम होणार नाही ना अशी शंका उपस्थित होते. या सोहळ्याची भुजबळांकडे सोपवलेली जबाबदारी आणि त्याच दिवशी जरांगे पाटलांचा अल्टिमेटम बघता मराठा विरुद्ध दलित समाज यांच्यात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा काही विघातक शक्तींचा हा डाव तर नाही ना असा संशय घेण्यास निश्चित वाव आहे.संबंधित यंत्रणांनी असे काही होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेऊन त्यादृष्टीने तातडीने पावले
उचलावीत. भुजबळ यांनी दलित समाजाची माफी मागितल्याशिवाय त्यांना बोधिवृक्ष फांदीरोपण आम्ही करू देणार नाही हे संबंधित यंत्रणांनी लक्षात घ्यावे. तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या बौद्ध उपासक आणि दलित बांधवांना कोणतीही बाधा पोहोचू नये यासाठी कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी अविनाश शिंदे, पवन पवार, वामनदादा गायकवाद, उर्मिला गायकवाड,
संजय साबळे, जितेश शार्दल, संदिप काकळीज, रवि पगारे
बाळासाहेब शिंदे, बजरंग शिंदे ,विश्वनाथ भालेराव, सुनिल साळवेआदींनी केली आहे.