नाशिक पोलीस आयुक्तालयाचा ३५ व्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत दणदणीत विजय!
क्रीडांगणातही खाकी वर्दीचा दबदबा! आयुक्तालयाने जिंकली ‘जनरल चॅम्पियनशिप’
नाशिक, १९ जानेवारी २०२५ – अहिल्यानगर येथे ५ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान रंगलेल्या ३५ व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने विजयाचा गजर केला आहे. जळगाव, धुळे, नाशिक ग्रामीण, नंदुरबार, अहिल्यानगर आणि नाशिक शहर अशा सहा जिल्ह्यांतील पोलीस दलांमध्ये झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत आयुक्तालयाच्या पुरुष आणि महिला पथकांनी ‘जनरल चॅम्पियनशिप’ पदकांवर आपले नाव कोरले आहे.
पुरुष पथकाने हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी आणि हँडबॉलमध्ये सुवर्णपदके पटकावली तर फुटबॉल आणि व्हॉलीबॉलमध्ये रौप्य पदके जिंकली. वैयक्तिक क्रीडा प्रकारातही आयुक्तालयाने आपली छाप सोडली. अथलेटिक्स, क्रॉस कंट्री, वेटलिफ्टिंग आणि स्विमिंगमध्ये चॅम्पियनशिप मिळवण्यासोबतच ज्युडो आणि कुस्तीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
महिला पथकानेही अजिंक्य कामगिरी बजावली. बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलमध्ये अव्वल स्थान पटकावताना कबड्डीमध्ये द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. वैयक्तिक स्पर्धांमध्ये अथलेटिक्समध्ये ८ सुवर्ण, १२ रौप्य आणि ७ कांस्यपदकांची कमाई करत महिला पथकाने आपले वर्चस्व सिद्ध केले. वेटलिफ्टिंगमध्ये चॅम्पियनशिप जिंकताना ज्युडो, कुस्ती आणि बॉक्सिंगमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही गटांनी ‘जनरल चॅम्पियनशिप’ जिंकून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने क्रीडाक्षेत्रातील आपले कौशल्य सिद्ध केले आहे. ही कामगिरी आयुक्तालयाच्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमाचे आणि समर्पणाचे फलित आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन!