स्वच्छ्ता सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आयुक्तांची इंदिरा गांधी वसाहत झोपडपट्टी भागास भेट !
लाल दिवा, ता. २७ : स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून देशातील टॉप शहरांमध्ये येण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने कंबर कसली आहे. सदर अभियानाच्या दृष्टीने शहराची स्वच्छता व मनपातर्फे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा केंद्रबिंदू असतात.स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अनुषंगाने शहरातील स्वच्छता अभियान राबविलेल्या व शहरातील सर्वात स्वच्छ पहिल्या तीन झोपडपट्टीना प्रोत्साहनपर पारितोषक देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा मा. आयुक्त यांनी नुकतीच केली होती.
त्यापार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज शहरातील प्रभाग २४ मधील लेखानगर येथील इंदिरा गांधी वसाहत क्र.२ झोपडपट्टीस भेट देऊन मूलभूत सेवासुविधांचा आढावा घेतला.यावेळी आयुक्तांनी सुलभ शौचालयाची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.यावेळी आयुक्त सो.यांनी संपूर्ण परिसरातील स्वच्छतेची पाहणी करून सदर परिसरातील नागरिकांशी चर्चा करून मनपाकडून देण्यात येणाऱ्या सेवांबद्दल माहिती विचारली तसेच शालेय वि्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना काही प्रश्न विचारले.
परिसरातील स्वच्छतेबाबत आयुक्त यांनी समाधान व्यक्त करून अशीच स्वच्छता कायम स्वरुपी ठेवणेकामी कार्यवाही करण्याच्या सूचना मनपा अधिकाऱ्यांना केल्या.यावेळी नागरिकांनी आयुक्त यांच्या भेटी बद्दल समाधान व्यक्त केले.याभेटी प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे,विभागीय अधिकारी मयूर पाटील , विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, मनपाचे सफाई कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.