देवळालीतून ‘वंचित’चे उमेदवार म्हणून अविनाश शिंदे यांची घोषणा; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष!
अविनाश शिंदे आगे बढो” च्या घोषणांनी देवळालीत गोंधळ
लाल दिवा-नाशिक,दि.१७ :- येत्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने देवळाली मतदारसंघातून नाशिकचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांना उमेदवारी जाहीर करताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. “अविनाश शिंदे आगे बढो, प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे यांच्या रुपात एका निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला असल्याची भावना कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आहे. शिंदे हे पक्षातील एक मजबूत स्तंभ मानले जातात आणि त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता असल्याचे बोलले जाते.
- सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तेजस्वी कारकीर्द
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शिंदे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वांशी मिळून मिसळून वागणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि त्यांचा अफाट जनसंपर्क यामुळे ते केवळ नेता नसून एक खऱ्या अर्थाने कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. पक्षाने त्यांच्या उमेदवारीतून एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान केला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. प्रथितयश बांधकाम व्यावसायिक, धुरंदर राजकारणी आणि कर्तव्यदक्ष समाजसेवक अशी त्यांची बहुआयामी ओळख आहे. देवळाली मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्यांना निश्चितच विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- आरपीआयपासून वंचित बहुजन आघाडी पर्यंतचा प्रवास
आरपीआयचा शाखाध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. लोकांचे प्रश्न सोडविण्याची तत्परता, दांडगा जनसंपर्क आणि उत्कृष्ट वक्तृत्व शैलीच्या जोरावर त्यांनी आपले स्थान निर्माण केले. आरपीआय नंतर भारिप आणि आता डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष म्हणून गेल्या सहा वर्षांपासून ते जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरात वंचित बहुजन आघाडीचा मोठा विस्तार झाला आहे. राजकारणाबरोबरच समाजकारणातही शिंदे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
- “पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार“
“पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. देवळाली हा आंबेडकरी विचारांचा मतदारसंघ आहे. यावेळी मतदार क्रांती घडवतील आणि वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देतील असा मला विश्वास आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.