अक्षय ऊर्जा” फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख वृक्ष रोपण : अनिल जाधव
सिडको, ता. २१ : पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या वर्षभरापूर्वी अक्षय तृतीयेनिमित्त सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली “अक्षय ऊर्जा” फाउंडेशनच्या माध्यमातून “सेव नेशन सेव नेचर” या संकल्पनेतून विविध पर्यावरण जनजागृती पर उपक्रम राबविण्यात आले होते. शुक्रवारी या सामाजिक उपक्रमाला एक वर्ष पूर्ण होत असून यात अधिक पर्यावरण संवर्धन होऊन जनजागृती व्हावी या उद्देशाने फाउंडेशनच्या समन्वयकांकडून पर्यावरण जनजागृतीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या उपक्रमाचे दुसरे वर्ष सुरू होत असल्याने यंदाच्या वर्षातही जास्तीत जास्त पर्यावरण जनजागृती कशा पद्धतीने करता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे. यात विविध उद्योजक, विद्यार्थी, राजकीय पदाधिकारी, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच अनेक सामाजिक संस्था या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. मागील वर्षभरात या फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल संपूर्ण महाराष्ट्रभरात एक लाख झाडे लावण्यात आली होती. नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे या उद्देशाने येत्या वर्षात मोठ्या प्रमाणात ‘झाडे लावा झाडे जगवा, इंधन वाचवा प्रदूषण टाळा, माती संवर्धन, नदी संवर्धन, शहरांमधील बदलते तापमान, अवकाळी पाऊस आदी विषयांवर जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती अनिल जाधव यांनी दिली आहे.