बजरंगवाडीतील गुन्ह्यातील आरोपी राहता येथून गजाआड
_पोलिसांची कामगिरी, तांत्रिक विश्लेषणाची मदत
लाल दिवा-नाशिक,दि.२७ : – बजरंगवाडी परिसरात तरुणाला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात मुंबईनाका पोलिसांना यश आले आहे. संकेत उर्फ खुंखार दादया नंदू तोरडमल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो राहता (जिल्हा अहमदनगर) येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी लहू शांताराम भोये (२०) हा आपल्या मित्रासोबत बजरंगवाडी येथील एका क्लिनिकमध्ये जात असताना संकेतने त्याला अडवले. त्याने लहूला चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७३/२०२४ अन्वये भादंवि कलम १०९, ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर संकेत फरार झाला होता. त्याचा शोध घेत असताना तो राहता येथे असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील, पोलीस हवालदार राजू टेमगर, सागर जाधव, राजेंद्र नाकोडे, पोलीस अंमलदार बागलाने आणि रात्रपाळीवरील पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने राहता येथे दाखल झाले.
संकेतला पकडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर केला. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने संकेतच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याला राहता येथून ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सध्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एन. शेख करीत आहेत.