जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास उशीर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात…!
लाल दिवा-नाशिक,ता.३१:- जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. जात वैधता प्रमाणपत्र विभागात अत्यंत संथ गतीने काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. दीड ते दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केलेले आहेत आणि ऑफलाइन सुद्धा कागदपत्रे सादर केलेली आहेत.
परंतु आजही विद्यार्थी ऑनलाइन अर्जाची स्थिती पाहतात तेव्हा ‘प्रलंबित’ (पेंडिंग) असेच दाखवत आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश (ऍडमिशन) अत्यंत जवळ आलेले आहेत आणि अजूनही जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नसल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दोन-दोन महिने अर्ज दाखल करून सुद्धा त्यावर कोणताही विचार होत नसल्याने विद्यार्थ्यांना संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वेळेवर प्रमाणपत्र मिळेल की नाही याबाबतही शंका उपस्थित होत आहेत. जर जात पडताळणी वेळेवर झाली नाही तर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जात पडताळणी समितीने या गंभीर बाबीची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून रोखावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.