दंडे ज्वेलर्सकडून अपहार करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे…!
लाल दिवा-नाशिक,ता.१७:याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की उपनगर हद्दीतील नाशिक- पुणे रोड येथे उड्डाणपुलाजवळ प्रसिद्ध दंडे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाचे संचालक मिलिंद मधुसूदन दंडे (वय 51) यांनी दि. 8 एप्रिल 2019 ते 10 मार्च 2023 या कालावधीत फिर्यादी विवेकानंद शिवराम उमराणी (वय 76, रा. वज्रनेत्र अपार्टमेंट, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक) यांना सोन्यावर 11 टक्के वाढ देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानुसार फिर्यादी उमराणी यांनी चार वर्षांच्या कालावधीत 44 तोळे सोन्याचा व्यवहार केला; मात्र बरीच वर्षे उलटूनही त्यावरील मोबदला अथवा 11 टक्के वाढ मिळत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर उमराणी यांनी दंडे ज्वेलर्सचे संचालक मिलिंद दंडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केली, तसेच 44 तोळे वजनाच्या सोन्याचा अपहार केला.या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार उपनगर पोलीस ठाण्यात मिलिंद दंडे यांच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भामरे करीत आहेत