नाशिकरोड मध्यरात्री झाली पाच लाखांची चोरी, दुकानात फराळ घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मोपेड केली लक्ष्य !
नाशिकरोडवर पुन्हा ‘त्यांचा’ धुराळा!
लाल दिवा-नाशिकरोड,दि.१२ :-नाशिकरोड परिसरात मध्यरात्री चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ताज्या घटनेत एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मोपेडमधून पाच लाख रुपये आणि महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी लंपास करण्यात आली आहे. ही घटना गुरुनानक पेट्रोल पंप जवळील ‘ए टू झेड’ नावाच्या किराणा दुकानाजवळ घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पाडुरंग मंडलीक (वय ६५, रा. पेंडारकर कॉलनी, जिजामाता नगर) हे दि. ११ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ज्युपिटर मोपेड (क्र. एम.एच. १५ एच.डब्लु 0238) वरून ‘ए टू झेड’ दुकानात फराळ आणण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांची मोपेड दुकानासमोर लावली आणि फराळ घेण्यासाठी दुकानात गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोपेडच्या डिकीत ठेवलेली कापडी पिशवी चोरून नेली. या पिशवीत ₹ ५,००,०००/- रोख रक्कम आणि मंडलीक यांचे स्टेट बैंक ऑफ इंडियाचे पासबुक व चेकबुक होते.
मंडलीक यांनी दुकानाबाहेर येऊन मोपेडची डिकी उघडली असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि चोरट्यांचा शोध घेत आहेत.
ही घटना मध्यरात्री घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.