नशिक: आडगाव पोलीस कारवाईत यशस्वी, दरोडेखोरांना ५ वर्षांचा तुरुंगवास, प्रत्येकी १५ लाखांचा दंड !
लाल दिवा-नाशिक ,दि.३१:-आडगांव पोलिसांनी दाखवलेल्या कामगिरीमुळे तीन दरोडेखोरांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी १५ लाख ७५ हजार रुपये असा एकूण ४५ लाख ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. २०१९ मध्ये एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या या तिघांना अखेर शिक्षा झाली आहे.
दिनांक २२ एप्रिल २०१९ रोजी रात्री साडेबारा वाजता आडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे ही घटना घडली होती. विवाह समारंभासाठी आलेल्या स्वाती विजय परमेश्वरे (वय ३३) यांचे मंगळसूत्र हिसकावून सोमनाथ हिरामण बर्वे, नितिन जिवाजी पारधे आणि अनिल भावराव पवार हे तिघे फरार झाले होते.
आडगांव पोलिसांनी केलेल्या तपासात या तिघांनी नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात अनेक दरोडे केल्याचे उघड झाले. माननीय जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथील न्यायाधीश श्री. एन. व्ही. निवणे यांनी आरोपींना दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपींना अतिरिक्त सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
आडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, अभियोग कक्ष, नाशिक शहर यांचे तपास आणि कोर्ट अंमलबजावणीसाठी कौतुक करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) श्री. प्रशांत बच्छाव आणि इतर अधिकाऱ्यांनी देखील या यशस्वी कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
ही कारवाई गुन्हेगारांविरुद्ध पोलीस विभागाच्या दृढनिश्चयाचे स्पष्ट संदेश देते..