वृद्धेला बांधून सोने लुटणारा चोरटा २४ तासात गजाआड..!
एमआयडीसी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांची उल्लेखनीय कामगिरी !
अंबड: पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका वृद्ध महिलेला बांधून तिच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे दागिने लुटणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. विलास महादू ढवळे (वय ४३, रा. नवनाथ नगर, अंबड, मूळ गाव दिंडोरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
दिनांक २६ ऑगस्ट रोजी संजीव नगर येथील राधाकृष्ण चौकातील एका घरात ही घटना घडली. पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या ढवळेने वृद्ध महिला राधाबाई गुंजाळ यांना मारहाण करून त्यांचे पाय बांधले. त्यानंतर त्याने त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे दागिने लुटून पळ काढला.
याप्रकरणी राधाबाई यांच्या सुनबाई प्रगिता प्रकाश गुंजाळ यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संशयिताच्या हालचाली आढळून आल्या. त्या आधारे पोलिसांनी २४ तासांच्या आत ढवळेला अटक केली. त्याच्याकडून लंपास आलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
न्यायालयाने ढवळेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
२५ हून अधिक सीसीटीव्हींची तपासणी: पोलिसांनी तांत्रिक कौशल्य वापरून संजीव नगर व आजूबाजूच्या परिसरातील २५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामुळेच त्यांना लवकर यश आले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील, जनार्दन ढाकणे, हेमंत आहेर, श्रीहरी बिराजदार, किरण सोनवणे, जितेश शिंदे आदींनी सहभाग घेतला.